मुंबई : पुण्यातील गोळीबार शेतीच्या वादातून भावकीत वैयक्तिक वादातून घडलेला प्रकार आहे. कुठेही खंडणीसाठी प्रकार नव्हता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घातले असून आरोपींना बारा तासात बेड्याही ठोकण्यात आल्या. पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनेवरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्या जनाब संजय राऊत यांनी आधी आपल्या सत्ताकाळातील कारभाराचा इतिहास तपासावा. महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्रात कायदा – सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर होती. त्या काळात अनेक गंभीर गुन्हे घडले तर पोलिस यंत्रणेचा वापर खंडणी वसुलीसाठी झाला होता. त्यामुळे फडणवीस सरकारवर टीका करण्याचा नैतिक अधिकार विरोधकांना नाही, असे प्रत्युत्तर देत भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी त्या काळातील गुन्ह्यांची जंत्रीच सादर केली. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संजय राऊत, तुमच्या माहितीसाठी, महाविकास आघाडीच्या काळात घडलेल्या गुन्हेगारीच्या घटना ऐकल्या तर थरकाप उडायचा. घराबाहेर पडायलाही लोकांना भीती वाटायची अशा पद्धतीचा कारभार उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना होता. पालघरमध्ये साधूंची हत्या करण्यात आली होती. साकीनाक्यात महिलेवर टेम्पोत बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. अभिनेता सुशांत सिंह प्रकरणाचा इतिहास सर्वांना माहित आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरण, अँटिलिया स्फोटक प्रकरण तुम्ही विसरला असाल. पोलिसांकरवी उद्योगपतीच्या घराबाहेर स्फोटके पेरून करून त्यांच्याकडून खंडणी वसूल करायची, हा इतिहास तुमचा आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, सचिन वाझे काय लादेन आहे का, म्हणून त्याचे दुर्दैवी समर्थन करत होते. आधी आपला इतिहास तपासा. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात श्री. बन यांनी वाभाडे काढले.
श्री. बन पुढे म्हणाले, उद्धव ठाकरेंचे सरकार असताना पुण्यामधील व्यावसायिक आनंद उनवणे यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली म्हणून अमरावतीमध्ये औषध विक्रेते उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. अमरावती, नांदेड, मालेगाव या ठिकाणी हिंसाचाराची अनेक प्रकरणे झाली होती. सुषमा अंधारे आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आकडेवारी वाचून दाखवताहेत. सुषमाताई, उद्धवजींच्या काळातील गुन्ह्यांची आकडेवारी ऐका. 2020 ला 148 हत्या झाल्या होत्या. 2021 ला 192 हत्या झाल्या होत्या. 2020 ला 614 तर 2021 ला 750 दरोडे पडले होते. 2020 ला 204 खंडणीच्या घटना घडल्या होत्या आणि 2021 ला 280 लोकांनी खंडणी मागितली होती. उद्धव ठाकरेंचे सरकार हे खंडणीखोरांचे सरकार होते, कारण त्यांचे गृहमंत्रीही खंडणी वसूल करायचे. हा त्यांचा इतिहास होता.
सुप्रियाताई मुख्यमंत्री होतील का, आणखी कुठल्या मंत्री होतील, हे येणारा काळ ठरवेल. परंतु ज्या पद्धतीने संजय राऊतांची अस्वस्थता वाढली आहे, सुप्रियाताईंबद्दल प्रश्न विचारल्याने संजय राऊत पत्रकारांवर भडकले की, तुम्ही किती वेळा राष्ट्रवादीचा प्रश्न विचारला. याचा अर्थ राष्ट्रवादी आणि सुप्रियाताईंबद्दलच्या बातम्या ऐकून संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा रक्तदाब वाढला आहे. त्यांची चिडचिड होणे साहजिक आहे. एखाद्या चांगल्या डॉक्टरांना भेटून संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतःचा रक्तदाब तपासून घ्यावा. येणाऱ्या काळात ज्या बातम्या येतील त्यामुळे संजय राऊतांचा रक्तदाब वाढणार असल्याने त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असा टोलाही श्री. बन यांनी लगावला.