पुणे : जय शंकर प्रतिष्ठान, पुणे या विश्वस्त संस्थेतर्फे सन २०२६ च्या राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कारासाठी नाशिक येथील ॲड. भानुदास शौचे, तर कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी मुंबई (अंधेरी) येथील सौ. मोना विकास साने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. येत्या मंगळवारी, १७ नोव्हेंबर २०२६ रोजी पुण्यात आयोजित सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

जय शंकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून सन २०१६ पासून अध्यात्मिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात अथक, निःस्पृह आणि निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या मान्यवरांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. तसेच महिलांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी सौ. माई सुरेखा पुराणिक यांच्या स्मरणार्थ ‘माई अभ्यंकर पुरस्कार’ देण्यात येतो. या माध्यमातून सामाजिक ऋण फेडण्याचा अल्पसा प्रयत्न संस्थेतर्फे केला जातो.

सन २०२६ च्या पुरस्कारांसाठी संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत ॲड. भानुदासजी शौचे (नाशिक) यांची जीवन गौरव पुरस्कारासाठी, तर सौ. मोना विकास साने (मुंबई-अंधेरी) यांची कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी सर्वानुमते निवड करण्यात आली.

पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ रोजी कार्तिक दुर्गाष्टमी आणि श्री शंकर महाराज प्रगटदिनानिमित्त सकाळी १० वाजता बाप्पा मोरया चौक, कै. विश्वनाथ बापूजी होले रोड, सातववाडी, हडपसर, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्यात जीवन गौरव पुरस्कार महान संत प.पू. महंत देवराह जंगलबाबा (प्रयागराज) यांच्या हस्ते ॲड. भानुदासजी शौचे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर माई अभ्यंकर पुरस्कार मा. प.पू. ह.भ.प. सौ. शिवअर्चना कुलकर्णी यांच्या हस्ते सौ. मोना विकास साने यांना प्रदान करण्यात येणार आहे.

यावेळी प.पू. महंत प्रेममूर्ती कृष्णकांतजी दास (हनुमान गढी, अयोध्या), प.पू. आनंदस्वामीजी महाराज (मठाधिपती, तपोवन, गंगोत्री) आणि मा. श्री. अनिलजी कवडे (आयुक्त, महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. सु. द. उर्फ पप्पाजी पुराणिक, सहचिटणीस डॉ. अमित शेष, कार्याध्यक्ष श्री. गजानन पत्की आणि कार्यवाहक श्री. श्रीपाद पुराणिक यांनी केले आहे.