चिपळूण : भारतीय संविधान हे केवळ देशाच्या कारभाराचे नियम सांगणारे पुस्तक नसून प्रत्येक नागरिकाला समानतेने, स्वातंत्र्याने आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारी व्यवस्था आहे. त्यामुळे प्रत्येकाने संविधान पाहिले पाहिजे, वाचले पाहिजे आणि समजून घेतले पाहिजे. आज शाळेत शिकणारे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे भविष्य आणि देश घडवणारे जबाबदार नागरिक आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आतापासूनच संविधानाची ओळख करून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार ललेश कदम यांनी केले.
26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल, शिरळ येथील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उपस्थित राहून संविधान दिन साजरा केला. यावेळी ललेश कदम यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्त्व आणि त्यातील मूल्यांविषयी मार्गदर्शन केले.
आपल्या मनोगतात कदम म्हणाले की, शाळेत मुलगा-मुलगी, गरीब-श्रीमंत असा भेद न करता सर्व विद्यार्थ्यांना समान शिक्षण, संधी मिळणे, प्रत्येकाचे मत ऐकून घेणे आणि एकमेकांना मदत करणे, हीच संविधानातील मूल्यांची सुरुवात आहे. संविधानाचा संबंध केवळ संसद किंवा न्यायालयापुरता मर्यादित नसून तो आपल्या शाळेशी, घराशी आणि समाजाशीही जोडलेला आहे.
आज आपण जे स्वातंत्र्याने आणि सन्मानाने जीवन जगत आहोत, त्यामागे भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांचे मोठे महत्त्व आहे. एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला, अत्याचार झाला किंवा तिच्या अधिकारांचे उल्लंघन झाले, तर न्याय मागण्यासाठी संविधानाने आपल्याला अधिकार आणि कायदेशीर संरक्षण दिले आहे. त्यामुळे आपल्या अधिकारांची माहिती असणे आणि इतरांच्या अधिकारांचाही आदर करणे आवश्यक आहे. संविधान हे केवळ पुस्तकात ठेवण्याची गोष्ट नसून ते प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी जोडलेले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांनी शिक्षणातून ज्ञान मिळवावे, प्रश्न विचारावेत, चिकित्सक विचार करावा आणि अन्यायाविरुद्ध शांततामय मार्गाने आवाज उठवावा. संविधानातील समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता ही मूल्ये केवळ भाषणापुरती मर्यादित न ठेवता आपल्या वागण्यात आणावीत, असे आवाहनही कदम यांनी केले.
अधिकारांबरोबरच कर्तव्यांची जाणीव ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. शाळेची स्वच्छता राखणे, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे, पर्यावरणाची काळजी घेणे आणि सर्वांशी आदराने वागणे या छोट्या कृतींतूनही संविधानाचा सन्मान करता येतो. चांगला विद्यार्थी होण्याबरोबरच चांगला माणूस आणि जबाबदार नागरिक बनण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी करावा, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, सामाजिक कार्यकर्ते राजूभाई जाधव, निवृत्त शिक्षक विलास सकपाळ, शाळेच्या मुख्याध्यापिका जान्हवी टाकळे, शिक्षिका अंकिता टेरवकर, श्रुती डाफळे, शिक्षक आदित्य तांबे, अश्विनी बामणे यांच्यासह विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.