लांजा : वाढदिवस म्हटला की जल्लोष, सत्कार, शुभेच्छांचा वर्षाव आणि विविध कार्यक्रमांची रेलचेल असे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. मात्र, या पारंपरिक उत्सवी स्वरूपाला फाटा देत स्वतःच्या वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून ती रक्कम दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी देण्याचा संकल्प शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हा उपप्रमुख रविंद्र डोळस यांनी केला आहे.
दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात पक्ष संघटनेतील युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले रविंद्र डोळस हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी खासदार विनायक राऊत यांचे निष्ठावंत सहकारी आहेत. पक्ष संघटनेतील विविध जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांनी राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती, पाणीटंचाई आणि घटती भूजल पातळी यामुळे शेतीसमोरील आव्हाने वाढत आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांच्या अडचणींची जाणीव ठेवून वाढदिवसावरील अनावश्यक खर्च टाळण्याचा निर्णय डोळस यांनी घेतला. यानिमित्ताने कोणताही जंगी सोहळा, सत्कार किंवा अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम आयोजित न करता साधेपणाने वाढदिवस साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना केले होते.
वाढदिवसानिमित्त मिळणाऱ्या शुभेच्छा, सत्कार आणि औपचारिक कार्यक्रमांपेक्षा संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबांच्या मदतीला प्राधान्य देणे अधिक महत्त्वाचे असल्याची त्यांची भूमिका आहे. वाढदिवसासाठी अपेक्षित असलेला खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वळविण्यासोबतच त्यांच्यासाठी भरीव मदतनिधी देण्याचाही त्यांचा मानस आहे.
वैयक्तिक आनंदाच्या प्रसंगाला सामाजिक उत्तरदायित्वाची जोड देणारा हा निर्णय केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता, इतरांनीही आपल्या आनंदाच्या क्षणी गरजू आणि संकटग्रस्त घटकांचा विचार करावा, असा संदेश देणारा आहे. वाढदिवसाचा आनंद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो गरजूंच्या मदतीसाठी उपयोगात आणण्याचा रविंद्र डोळस यांचा हा संकल्प सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेला अधोरेखित करणारा ठरत आहे.
