मंडणगड : मंडणगड तालुक्यातील बाणकोट गावातील जेतवननगर (बौद्धवाडी) येथील मानस प्रशांत जाधव याने आपल्या उल्लेखनीय कामगिरीने बाणकोट गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. जिल्हास्तरीय परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केल्यानंतर सुमारे वर्षभरापूर्वी मानसची भारतातील भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि अमेरिकेतील जगप्रसिद्ध नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (NASA) यांच्या शैक्षणिक अभ्यासदौऱ्यासाठी निवड करण्यात आली होती. या निवडीमुळे त्याला अवकाश संशोधन, विज्ञान आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगती प्रत्यक्ष अनुभवण्याची अनमोल संधी प्राप्त झाली. १२ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत झालेल्या १४ दिवसांच्या अमेरिका दौऱ्यात मानसने अ‍ॅस्ट्रोनॉट ट्रेनिंग सेंटर (Astronaut Training Center) आणि केनेडी स्पेस सेंटर (Kennedy Space Center) यांसारख्या महत्त्वपूर्ण ठिकाणांना भेटी दिल्या.

तसेच मियामी, लास वेगास, फ्लोरिडा, फ्रेस्नो (Fresno), लॉस एंजेलिस आणि सॅन फ्रान्सिस्को यांसह अमेरिकेतील विविध शहरांना भेटी देऊन तेथील विज्ञान, तंत्रज्ञान, आधुनिक सुविधा आणि प्रगतीचा अनुभव घेतला.जगप्रसिद्ध नासाला भेट देऊन अवकाश संशोधन आणि अंतराळवीरांच्या प्रशिक्षणाशी संबंधित बाबींची माहिती घेणे ही मानसच्या शैक्षणिक प्रवासातील अत्यंत महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे. जिल्हास्तरीय परीक्षेतून मिळालेल्या या संधीचे त्याने यशस्वीरीत्या सोने केले असून १४ दिवसांचा अमेरिका दौरा पूर्ण करून तो मायदेशी परतला आहे. मानसची ही कामगिरी केवळ त्याच्या कुटुंबीयांसाठीच नव्हे, तर बाणकोट गावासाठी, जेतवननगर (बौद्धवाडी) आणि संपूर्ण समाजासाठी अत्यंत अभिमानाची व गौरवाची बाब आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील आपल्या बुद्धिमत्तेच्या, जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करू शकतात, हे मानसने आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे.त्याच्या या प्रेरणादायी यशस्वी प्रवासामुळे गावातील तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना विज्ञान, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी स्वप्ने पाहण्याची व ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळणार आहे.
मानसने भविष्यात विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात आणखी मोठी भरारी घेऊन आपल्या कुटुंबाचे, गावाचे, समाजाचे आणि देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा परिसरातुन देण्यात येत आहेत.