चिपळूण : रक्षाबंधनाचे औचित्य साधून देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समाजसेवक विनेश भाऊ मोहिते सामाजिक विकास ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राखी संकलन मोहिमेचा पाचवा पर्व लक्षवेधी ठरला आहे. रत्नागिरी जिल्ह्यासह चिपळूण, गुहागर, खेड, लोटे तसेच कराड, सांगली आणि ठाणे आदी ठिकाणांहून तब्बल ४ हजार २२२ राख्यांचे संकलन करण्यात आले.
समाजसेवक विनेश भाऊ मोहिते यांच्या संकल्पनेतून हा देशप्रेमाचा उपक्रम राबविण्यात आला. चिपळूण व गुहागर तालुक्यातील नागरिक, माता-भगिनी, महिला बचत गट, शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, युवक तसेच विविध सामाजिक संस्थांनी त्यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक चिमुकल्या बालकांनी व भगिनींनी प्रेमाने तयार केलेल्या राख्याही या उपक्रमासाठी देण्यात आल्या.
संकलित करण्यात आलेल्या या सर्व राख्या सीमाभागात देशाचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांना पाठविण्यात येणार असून, चिपळूण-गुहागरमधील भगिनींचे प्रेम, माया आणि सदिच्छा राख्यांच्या माध्यमातून जवानांपर्यंत पोहोचणार आहेत.
याबाबत बोलताना समाजसेवक विनेश भाऊ मोहिते म्हणाले, “सीमेवर कुटुंबापासून दूर राहून देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिक भावांसाठी चिपळूण आणि गुहागर तालुक्यातील भगिनींनी मोठ्या प्रेमाने राख्या सुपूर्द केल्या आहेत. कोकणातील नागरिकांनी नेहमीच सामाजिक व देशप्रेमाच्या उपक्रमांना मोठा प्रतिसाद दिला आहे. या भरघोस प्रतिसादामुळे आमची सामाजिक जबाबदारी आणखी वाढली आहे.” त्यांनी या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले.
या उपक्रमाच्या नियोजनात लिटिल चॅम्प्स इंग्लिश स्कूल, जानवळेचे मुख्याध्यापक हेमंत शिरकर, मिरजोळी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दलवाई हायस्कूल, मिरजोळीचे मुख्याध्यापक रोहित जाधव तसेच श्री सत्यनारायण मित्रमंडळ, कादवड तांबडवाडी समाज मंदिर येथील नितीन शिगवण यांचे विशेष योगदान राहिले. उत्कृष्ट नियोजनाबद्दल या तीन ठिकाणी अभिनंदनपत्र देऊन गौरव करण्यात आला.
देशप्रेमाच्या या उपक्रमात शिक्षक, विद्यार्थी, युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते, माजी सैनिक, विद्यमान सैनिक तसेच विविध क्षेत्रांतील नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला. माजी सैनिक संभाजी चव्हाण, सुनील खरात, विद्यमान सैनिक इकबाल चिपळूणकर, राजेश कोकरे, विजय खरात, साद कडवेकर, जितेंद्र कांबळे, ओंकार उदेग, सामाजिक सेवक प्रसाद वनगे, सुधीर मोरे, समीर कदम, नितीन शिगवण, संदीप मोहिते, सुशांत मोहिते, सतीश गजमल, अनिल पिनगे, वैभव मोहिते, विवेक जाधव,अजय कडव,राहुल कदम, रेशमा कदम, सुचिता तांबे, साहिल तांबे, विशाल मोहिते, महेश मोहिते, उद्योजक हेमंत जाधव, उद्योजक मनोहर मोहिते आदींनी योगदान दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केशव खाडे यांनी केले. सूत्रसंचालन सचिन पवार यांनी केले, तर छायाचित्रण आकाश मोहिते यांनी केले.
रत्नागिरी जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था, महिला मंडळे, शैक्षणिक संस्था आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत या देशप्रेमाच्या उपक्रमाला बळ दिले. जवानांच्या मनगटावर बांधल्या जाणाऱ्या या राख्यांमधून कोकणच्या भगिनींचे प्रेम आणि देशभक्तीची भावना सीमेपर्यंत पोहोचणार आहे.