लांजा (प्रतिनिधी) : पेट्रोलियम पदार्थ आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे.‌ या विरोधात लांजा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज लांजा तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.
तहसीलदार प्रियांका ढोले यांना सादर करण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण देशात सध्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकाला जगणे कठीण झाले आहे.‌ अशा परिस्थितीत केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर तसेच पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत सातत्याने वाढ करून सामान्य जनतेवर अतिरिक्त आर्थिक बोजा टाकला आहे. त्यामुळे त्या कुटुंबियांचे मासिक अर्थकारण देखील कोलमडले असून गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमती वाढल्या तरी त्याचा भार सर्वसामान्य नागरिकांवर पडू दिला गेला नव्हता. अनुदानाच्या माध्यमातून जनतेला दिलासा देण्याचे काम त्याकाळी करण्यात आले होते.परंतु सध्याच्या सरकारच्या काळात एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ करून जनतेची आर्थिक कोंडी केली आहे. यापूर्वी घरगुती गॅस सिलेंडर हा ४०० रुपयांच्या आसपास उपलब्ध होता. परंतु आता एका गॅस सिलेंडरसाठी ९०० रुपये किंवा अधिक रक्कम मोजावी लागत आहे. याशिवाय सिलेंडर मिळवण्यासाठी कालावधी देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती एक हजार रुपयांच्यावर असून त्याचा थेट परिणाम हॉटेल, खानावळी, छोटे व्यवसायिक आणि सामान्य ग्राहकांवर होत आहे. खाद्यपदार्थांची किमती देखील यामुळे वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सरकारकडून गॅसची टंचाई नसल्याचे जरी सांगितले जात असले तरी प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असून सामान्य नागरिक तसेच छोटे व्यावसायिक, हॉटेल चालक, खानावळ चालक यांना गॅस सिलेंडर सहज उपलब्ध होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात व सर्वच जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या दृष्टीने जनतेची हिताची बाजू लक्षात घेऊन सरकारने योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .
सदर निवेदन सादर करताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नुरूद्दीन सय्यद, तालुकाध्यक्ष राजेश राणे, तसेच महेश सप्रे, संतोष लोटणकर प्रभाकर कांबळे, चिमाजी विचारे, काशीराम लोटणकर, प्रकाश कांबळे, सुरेश पाध्ये, सुरेश खानविलकर, दीपक जाधव, मनोहर कदम, शुभम डांबरे, सुरेश भगते आदी उपस्थित होते