मुंबई : राज्यातून मान्सूनने माघार घेतली असल्याचं काही दिवसांपूर्वीच हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलं होतं. मात्र आता हवामान बदलांमुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आज 17 ऑक्टोबरनंतर राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होणार असल्याचं हवामान तज्ञांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रात 20 ते 25 ऑक्टोबरदरम्यान परतीचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. या परतीच्या पावसाने शेतकऱ्याची रब्बीची पेरणी होणार आहे. पण हा पाऊस सर्वदूर पडणार नाही. तो काही ठिकाणी होण्याचा अंदाज आहे. हवामान तज्ञांच्या अंदाजानुसार, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, धाराशिव, लातूर, सोलापूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, जालना, छत्रपती संभाजीनगर या पट्ट्यात पावसाचं स्वरुप जास्त असणार आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. यादरम्यानच 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. दरम्यान, विदर्भातील काही भागात देखील हा पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हा पाऊस वादळी स्वरूपाचा तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे एकूणच वाढलेल्या उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.