चिपळूण : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर चायनीज फटाके आणि प्रतिबंधित फटाक्यांची अवैध साठवणूक, वाहतूक व विक्री रोखण्यासाठी चिपळूण प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. अशा फटाक्यांच्या बेकायदेशीर व्यवहारांबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी प्रवीण लोकर यांनी विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत.
यासंदर्भात ३ नोव्हेंबर २०२६ रोजी चिपळूण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना लेखी निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशानुसार ही कारवाई केली जाणार आहे.
या मोहिमेंतर्गत तालुक्यातील सर्व फटाके विक्रीची दुकाने, गोदामे, साठवणूक केंद्रे तसेच संशयित ठिकाणांची विशेष तपासणी करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार पोलीस, अग्निशमन विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि पेट्रोलियम व विस्फोटक सुरक्षा संघटनेच्या (PESO) समन्वयाने संयुक्त तपासणी करण्याचे निर्देश आहेत.
विस्फोटक नियम २००८ मधील नियम ७४, ७५, ६२, ६३, ८४, १२७ व १२८ नुसार परवानगीपेक्षा अधिक साठा, परवान्याच्या अटींचे उल्लंघन, सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष तसेच प्रतिबंधित फटाक्यांची विक्री होत आहे का, याची खातरजमा केली जाणार आहे.
प्रत्येक दुकानाचा परवाना, साठवणूक क्षमता, खरेदी-विक्री नोंदी, मालाचा स्रोत आणि अग्निसुरक्षा व्यवस्थेची तपासणी केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास अवैध साठा जप्त करणे, विक्री रोखणे, दुकान बंद करण्याची कारवाई तसेच संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाईसाठी प्रकरण पोलिसांकडे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, केवळ परवानाधारक दुकानांचीच नव्हे, तर अवैध साठवणुकीचा संशय असलेल्या ठिकाणांचीही तपासणी करण्याचे आदेश आहेत. या कारवाईचा सविस्तर अहवाल तहसीलदार कार्यालयात सादर करावा लागणार आहे.
नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी या आदेशांची तातडीने व प्राधान्याने अंमलबजावणी करण्याचे निर्देश तहसीलदारांनी दिले आहेत.