लोटे :- लोटे परशुराम लगत असलेल्या विस्तारित औद्योगिक वसाहती मधील मुख्य जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया गेल्याचे खात्रीलायक वृत्त समोर आले असून तब्बल अठरा तासांनी जलवाहिनी ची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे समजते.
लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीवर गतवर्षी पाण्याअभावी अठरा दिवस उद्योग बंद ठेवण्याची वेळ आली होती. आणि या वर्षी सुद्धा समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. असे असताना सुद्धा हजारो लिटर पाणी कित्येक वेळा वाया जात असते. कधी पाईपलाईन फुटते तर कधी लिक होते. उद्योगांसाठी पाणी हा मुख्य कच्चामाल आहे. मात्र पाईपलाईनच्या वारंवार येणाऱ्या दुरुस्ती मुळे कित्येक वेळा असे पाणी वाया जात असते. अशीच घटना अतिरिक्त औद्योगिक वसाहती मध्ये दोन दिवसापूर्वी घडली. लोटे येथून अतिरिक्त औद्योगिक वसाहतीसाठी पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली. यानंतर खेड येथील मनीषा कन्स्ट्रक्शन नामक ठेकेदाराला याच्या दुरुस्तीचे काम देण्यात आले. मात्र तब्बल अठरा तास हे काम पूर्ण झाले नव्हते. परिणामी या अठरा तासात हजारो लिटर पाणी वाया गेले. अठरा तासानंतर हे दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आणि उद्योगांचा पाणीपुरवठा सुरळीत झाला, असे एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
लोटे अतिरिक्त औद्योगिक वसाहती मध्ये हजारो लिटर पाणी गेले वाया; अठरा तासानंतर जलवाहिनी ची दुरुस्ती पूर्ण…
