महाराष्ट्र : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ८९.७९ टक्के निकाल लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे २.९ टक्क्याने निकाल घटला आहे.
कोकण विभागाचा सर्वाधिक ९४.१४ टक्के, लातूर विभागाचा सर्वांत कमी ८४.१४टक्के निकाल लागला. राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी राज्य मंडळात झालेल्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक, योजना संचालक कृष्णकुमार पाटील, माध्यमिक सहसंचालक डॉ. श्रीराम पानझाडे, कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर या वेळी उपस्थित होते.
गेल्यावर्षी बारावीचा निकाल ९१.८८ टक्के लागला होता. दरवर्षीप्रमाणेच यंदाही मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. ९३.२५ टक्के मुली, तर ८६.८० टक्के मुले उत्तीर्ण झाली. त्यामुळे मुलांच्या तुलनेत ६.३५ टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. परीक्षा घेण्यात आलेल्या १५४ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला. शाखानिहाय निकाल – विज्ञान – ९६.४४ टक्के , कला – ७८.०२ टक्के , वाणिज्य – ८७.०४ टक्के, व्यवसाय अभ्यासक्रम – ८२.७४ टक्के , आयटीआय – ८१.७८ टक्के विद्यार्थी, पालकांनी कोणताही ताण न घेता विद्यार्थ्यांनी निकाल स्वीकारावा. निकालाच्या संकेतस्थळावरील ट्रॅफिक टाळण्यासाठी
१२ वाजल्यापासूनच निकाल उपलब्ध करून दिला जाणार आहे, असे त्रिगुण कुलकर्णी यांनी सांगितले.
