नवी दिल्ली : महाराष्ट्र सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे, पण शेतकऱ्यांना अद्याप मदत दिली जात नाही. आम्ही दुष्काळाविरोधात लढत आहोत. महागाई वाढत आहे. लोकांनी जगायचं कसं?,असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.

सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या की, जंतरमंतरवर एक 14 वर्षाचा मुलगा एकटाच चालला होता. त्याला पोलिसांनी जायला मज्जाव केला. त्यावेळी त्याने तुम्हाला कलम 144 माहीत आहे का? असा सवाल पोलिसांना केला. मी एकटा चाललोय. मला कोणी थांबवू शकत नाही, असं तो मुलगा म्हणाला. कायद्यानुसार तुम्ही मला अटक करू शकत नाही, असं तो पोलिसांना सांगत होता,तुम्ही एकट्या मुलाला का अटक करत आहात? दिल्ली पोलिसांच्या मनात काय आहे कळत नाही,देश आणीबाणीच्या दिशेने चालला का हे दिसत आहे,असे सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,सरकारची नैतिकता संपली आहे. निवडणूक आयोग स्वायत्त आहे. तरीही तुमच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यावेळी नैतिक जबाबदारी घ्यावी की नाही? सत्ताधाऱ्यांची नैतिकता संपलीय का अशी वेळ आली आहे. सरकार दरबारी न्याय मागत आहोत. लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं. राष्ट्रपतींना न्याय मागितला. पण मिळाला नाही, असे सुप्रियाताई सुळे यांनी स्पष्ट केले आहे.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठी व्होट चोरी झाली आहे, यावर मी ठाम आहे. तुम्ही लोकसभा निवडणुकीत निवडून आल्या, मग व्होट चोरी कशी झाली? असं सत्ताधारी मला विचारतात. माझं त्यांना खुलं आव्हान आहे, या व्होट चोरीची माझ्या मतदारसंघापासून चौकशी सुरू करा. माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघातील एकट्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातून 2,50,000 लाख मतदार गायब झाले आहेत. हे मतदार गेले कुठे? या समोर, चर्चा करा, मी चर्चेला तयार आहे, असेही सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले आहे.

पुढे बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,बारामती लोकसभेपासून चौकशी सुरू करा. मी निवडून आले म्हणून माझ्या मतदारसंघातून चौकशी करू नये असं नाही. चौकशीसाठी माझी तयारी आहे. व्होटर लिस्ट द्या. नावं कुठली गेली? कुठे गेली सांगा? राज्यात सहा विधानसभेमागे एक लोकसभा मतदारसंघ आहे. माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघात खडकवासला विधानसभा आहे. खडकवासलात मी मायनस आहे. हवं तर मी जिथे प्लस आणि मायनस आहे, ते दोन्ही मतदारसंघ चौकशीसाठी घ्या. बारामती लोकसभा मतदारसंघात 7 लाख मतदार कमी झाले. त्यातील अडीच लाख मतदार एकट्या खडकवासल्यात कमी झाले. विधानसभेला अडीच लाख लोकांनी मतदान केलं. लोकसभेला या विधानसभेत 5 लाख मतदार होते. त्यात विधानसभेत 50 हजाराची वाढ झाली. विधानसभेनंतर हा मतदारसंघ अडीच लाखांनी परत कमी झाला. मग हे अडीच ते तीन लाख मतदार कोण असू शकतात? दुबार असू शकतात? एखाद्याने घर बदललं असू शकतं? माहिती द्या. अडीच लाख मतदार कसे कमी झाले? 50 हजार अधिकचे मतदार कसे वाढले? म्हणजे 3 लाख मतदार माझ्या लोकसभा मतदारसंघातून कमी झाले, असे सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना स्पष्टपणे सांगितले आहे.

यावर सविस्तर बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,केवळ राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही. तर यंत्रणेत बदल आणला पाहिजे. सशक्त लोकशाहीत चर्चेनेच प्रश्न सुटू शकतो. आम्ही चर्चेला तयार आहोत. समोरचे कुठे तयार आहेत?, बेरोजगारी वाढली हे देशाचा डेटा सांगतो, महागाई वाढली हे देशाचा डेटा सांगतोय. व्होट चोरी झालीय हा डेटा सांगतोय, तुम्ही दुष्काळ रोजच दाखवत आहात. एवढी आव्हाने असताना सत्ताधारी त्यावर काही करताना दिसत नाहीत. सत्ताधारी चर्चेला का तयार नाही? असा सवाल सुप्रियाताई सुळे यांनी केला आहे.