लांजा: मुंबई-गोवा महामार्गावर कुवे पुरागाव येथे एका दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ५४ वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाला असून धडक देणारा दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

याबाबत लांजा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर सिताराम गुरव (वय ५४, रा.वनगुळे, गुरववाडी, ता.लांजा) हे रविवारी सायंकाळी आपल्या ताब्यातील मेस्ट्रो दुचाकी (एमएच.०८.एसी.१८८९) घेऊन मुंबई-गोवा महामार्गावरून वनगुळेच्या दिशेने जात होते. ते कुवे पुरागाव येथे आले असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या डीओ दुचाकीने (एमएच.०८.एएम.९२२७) गुरव यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. ही दुचाकी प्रथमेश रमेश करंबळे (वय २६, रा.आगरवाडी, लांजा, ता.लांजा) चालवत होता.

या अपघातात मनोहर गुरव आणि प्रथमेश करंबळे हे दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर काही वेळातच मनोहर गुरव यांचा मृत्यू झाला. तर प्रथमेश करंबळे याला पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

या प्रकरणी सुहास सखाराम भोवड (वय३४, रा.वनगुळे खालचीवाडी, ता.लांजा) यांनी लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार प्रथमेश करंबळे याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), २८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पुढील तपास लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय मारळकर करीत आहेत.