मंडणगड : जिल्हास्तरीय ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत चिपळूण तालुक्यातील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कस्तुरी घाग हिने प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. डेरवण स्टेडियम येथे आयोजित या स्पर्धेतील तिच्या यशामुळे शाळेच्या आणि परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

कस्तुरीच्या या यशाबद्दल भाजपा चिपळूण तालुका ग्रामीण अध्यक्ष उदय घाग यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन तिचा गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी तिच्या जिद्दीचे, मेहनतीचे आणि क्रीडाक्षेत्रातील कामगिरीचे कौतुक केले.

उदय घाग म्हणाले, “कस्तुरीने जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून आपल्या गुणवत्तेची आणि मेहनतीची चुणूक दाखवून दिली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही मोठी क्षमता आहे, हे तिच्या यशातून सिद्ध झाले. तिने भविष्यातही अशीच कामगिरी करून तालुका, जिल्हा आणि राज्याचे नाव उज्ज्वल करावे. तिच्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे.”

अनुसूचित जाती मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश मोहिते म्हणाले, “कस्तुरीचे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. अभ्यासाबरोबरच क्रीडाक्षेत्रातही विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य विकसित करावे. योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठी शिखरे गाठू शकतात. कस्तुरीने भविष्यातही यशाची हीच परंपरा कायम ठेवावी.”

यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश घाग, दीपक मोहिते उपस्थित होते. कस्तुरीच्या यशाचे परिसरातून अभिनंदन होत आहे.