मंडणगड : मंडणगड तालुका मंडप डेकोरेटर्स असोसिएशन व साऊंड व्यावसायिकांनी शासनाने निर्धारित केलेल्या ध्वनी मर्यादा व नियमांचे पालन करण्याची तयारी दर्शवित, साऊंड व्यवसायासाठी नियमानुसार योग्य वेळ उपलब्ध करून देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
यासंदर्भात असोसिएशनच्या वतीने २८ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले. मंडप डेकोरेटर्स व साऊंड व्यवसाय हा विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक तसेच कौटुंबिक कार्यक्रमांशी संबंधित असून, या व्यवसायावर तालुक्यात अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शासनाने ध्वनी प्रदूषणासंदर्भात निश्चित केलेले नियम, ध्वनीची मर्यादा (डेसीबल) तसेच प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पूर्णपणे पालन करण्यास व्यावसायिक तयार असल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले आहे. मात्र, साऊंड व्यवसायासाठी उपलब्ध होणाऱ्या वेळेवर असलेल्या मर्यादांमुळे व्यवसायावर आर्थिक परिणाम होत असून अनेक व्यावसायिकांसमोर अडचणी निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.शासनाने ठरवून दिलेल्या ध्वनी मर्यादेत राहून तसेच लागू असलेल्या नियमांचे पालन करून कार्यक्रमांच्या स्वरूपानुसार योग्य वेळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी असोसिएशनने केली आहे. प्रशासनासोबत पूर्ण सहकार्य करण्याची आणि सर्व नियमांचे पालन करण्याची जबाबदारी व्यावसायिकांनी स्वीकारली असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. साऊंड व्यवसायावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांच्या रोजगाराचा व उपजीविकेचा विचार करून, शासनाच्या नियमांच्या चौकटीत राहून साऊंड व्यवसाय करण्यासाठी आवश्यक तेवढी परवानगी व वेळ उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती असोसिएशनने प्रशासनाकडे केली आहे.