दापोली : महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी (शुक्रवार, २ ऑक्टोबर २०२६) दापोली नगरपंचायत कार्यालयासमोर प्रसाद गणेश कर्वे यांनी उपोषण सुरू केले आहे. दापोली नगरपंचायतीमधील ५५ अस्थायी (रोजंदारी) कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे आणि मौजे जोगेळे येथील कथित अनधिकृत बांधकामांना स्थगिती द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी त्यांनी हे आंदोलन पुकारले आहे.

​या आंदोलनासंदर्भात दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कृपाताई घाग यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

​नगराध्यक्षा कृपाताई घाग यांची भूमिका:
​अस्थायी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक प्रयत्न: दापोली नगरपंचायतीमधील ५५ अस्थायी रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मोठे शासनस्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.

​शासकीय पातळीवर पाठपुरावा: हा विषय गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम आणि आमदार रामदासभाऊ कदम यांच्यासह संपूर्ण शिवसेना परिवारामार्फत शासनस्तरावर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाचा फायनल टप्पा मंत्र्यांच्या पातळीवर आला असून, लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावर मोठा निर्णय होऊन कॅबिनेटमध्ये या कर्मचाऱ्यांच्या समावेशाबाबत निर्णय घेतला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

​जोगेळे घरजागा प्रश्न आणि धोरणात्मक निर्णय: जोगेळे येथील निवासी रेखांकनाचा प्रश्न हा नगरपंचायत आणि शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय असणारा विषय असल्यामुळे याची सखोल चौकशी करून अंतिम निर्णयापर्यंत फाईल आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

​प्रसाद कर्वे यांनी आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे दापोली तालुक्याचे या आंदोलनाकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे.