रायगड : ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आरक्षण बचाव यात्रे’ला खालापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार आणि रायगड जिल्हाध्यक्ष संदेश भालेराव यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या यात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून करण्यात आली.
यावेळी बोलताना ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांनी राज्य व केंद्र सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केलीये . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जाती-जमातींना ऐतिहासिक अन्यायाची भरपाई म्हणून आरक्षण दिले असून ते मूळ स्वरूपात कायम राहिले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडलीये .
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) हा आरक्षण आणि संविधानविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे RSS शी संबंधित असल्याने राज्य सरकारमध्ये त्यांचा अजेंडा राबविला जात असल्याचा दावा केदार यांनी केलाये . अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न हा धोकादायक असून त्यामागे आरक्षण कमकुवत करण्याचे कटकारस्थान असल्याचा आरोपही त्यांनी केलाये .
राज्यात विविध समाजघटकांमध्ये तेढ निर्माण करून संघर्ष निर्माण करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करत, बहुजन समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर प्रेरित होऊन राजकीय सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे ते म्हणाले. आरक्षण बचाव यात्रेचा उद्देश बहुजन समाजाला त्यांच्या घटनात्मक हक्क आणि अधिकारांबाबत जागृत करून अन्यायाविरोधात संघटित लढा उभारणे हा असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेये .
यावेळी त्यांनी देशात वाढत असलेला जातीयवाद, महिला व मागासवर्गीय घटकांवरील अत्याचार, लाडकी बहीण योजना आणि नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणावरून सरकारवर हल्लाबोल केला. तसेच तरुणांच्या प्रश्नांवर आणि संविधानिक अधिकारांच्या संरक्षणासाठी कार्यरत असल्याचे सांगितलेल्या कॉकरोज जनता पार्टीला पाठिंबा जाहीर केला.
या कार्यक्रमास ऑल इंडिया पँथर सेनेचे रायगड जिल्ह्यासह राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.