मुंबई : पक्षाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि अनिकेतचे वडील म्हणून बिनविरोध निवडीचा विजय आम्हा सर्वांचे लाडके नेते आदरणीय अजितदादांना समर्पित करतानाच आज जे काही यश मिळवू शकलो ही दादांची पुण्याई आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आपल्या भावना माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केल्या.
दरम्यान अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे समजताच सुनिल तटकरे आणि पदाधिकाऱ्यांनी दादांना अभिवादन करून या विजयाचा आनंद पेढे भरवून साजरा केला.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमच्या नेत्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने एक अभूतपूर्व यश कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनिकेत तटकरेंच्या रुपाने मिळवले आहे त्यामुळे या सर्व नेत्यांचे ऋण आणि आभार सुनिल तटकरे यांनी मानले.
याशिवाय भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे अंत:करणापासून आभार मानतानाच शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानण्यासाठी माझ्याकडील शब्द भांडारात शब्द कमी पडले आहेत असेही सुनिल तटकरे म्हणाले. या मतदारसंघात शिवसेनेची संख्या जास्त होती. गेले काही दिवस समज – गैरसमज जे काही होते. या सगळ्या पार्श्वभूमी एकनाथ शिंदे यांनी समन्वय घडवून आणण्यात महत्त्वाची व मोलाची भूमिका बजावली आहे. त्याबद्दल सुनिल तटकरे यांनी त्यांचे आभार मानले.
दरम्यान खासदार नारायण राणे, मंत्री उदय सामंत, मंत्री नितेश राणे, मंत्री योगेश कदम, आमदार भरत गोगावले, आमदार दिपक केसरकर, आमदार निलेश राणे, आमदार किरण सामंत, आमदार शेखर निकम, आमदार रवी पाटील, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्यासह संबंध महायुतीतील नेत्यांचे याशिवाय सर्व मतदारांचेही आभार सुनिल तटकरे यांनी मानले.
राजकारणात वावरत असताना संयम, समन्वय, आणि परस्परांबद्दल असलेला आदर योग्य पध्दतीने राखला तर त्यातून पाठबळ मिळते. या निवडणुकीत कमालीचे यश मिळाले आहे. त्यामुळे महायुतीचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून येतील असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.
