मुंबई : संगमनेर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाच्या कायदेशीर घडामोडीत सर्वोच्च न्यायालयाने आमदार अमोल खताळ यांनी दाखल केलेली विशेष अनुमती याचिका (SLP) फेटाळून लावली आहे. त्यामुळे काँग्रेस नेते तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या निवडणूक याचिकेवरील नियमित सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
बाळासाहेब थोरात यांनी दाखल केलेल्या निवडणूक याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की, अमोल खताळ यांनी विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रामध्ये शासकीय कराची थकबाकी तसेच ‘नीलकमल’ भागीदारी संस्थेतील भागीदार असल्याची माहिती जाणीवपूर्वक लपवली. त्यामुळे त्यांचे नामनिर्देशन अवैध ठरवून त्यांची निवड रद्द करावी आणि बाळासाहेब थोरात यांना विजयी घोषित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या याचिकेला विरोध करत अमोल खताळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून निवडणूक याचिका चालविण्यास कोणतेही वैध कारण (Cause of Action) नसल्याचा युक्तिवाद केला होता. त्यामुळे याचिका प्रारंभीच फेटाळून लावावी, अशी त्यांची मागणी होती. मात्र, उच्च न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावत निवडणूक याचिका सुनावणीस पात्र असल्याचे स्पष्ट केले.