मुंबई : उबाठा गट वाढण्यासाठी संजय राऊत जितका प्रयत्न करत नाहीत, त्यापेक्षा जास्त प्रयत्न काँग्रेस वाढली पाहिजे आणि राहुल गांधी पंतप्रधानपदावर बसले पाहिजे यासाठी करतात. आज ते ज्या पोटतिडकीने तशी भूमिका मांडत आहेत, त्यावरून स्पष्ट होते ते मीठ उबाठा गटाचे खात आहेत पण चाकरी मात्र काँग्रेस आणि राहुल गांधींची करत आहेत, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला. बिर्ला क्रीडा केंद्रात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ममता बॅनर्जी, शरद पवार यांचे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करायचे असतील तर मग उबाठा गटाचे काँग्रेसमध्ये विसर्जन करून राहुल गांधी यांना काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करणार आहात का, याचे उत्तर आधी संजय राऊत यांनी द्यावे. उबाठा गट वाढवण्याची किंवा भूमिका मांडण्याची जबाबदारी असताना फक्त आणि फक्त राहुल गांधींची भूमिका मांडण्याचे काम आणि काँग्रेस वाढवण्याचा प्रयत्न त्यांच्यामार्फत केला जातो आहे. इंडिया आघाडीच्या ठिकऱ्या उडवण्याचे काम महाराष्ट्रात, देशातही झाल्याने काँग्रेस ही नाकर्ते लोकांची पार्टी आहे, हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. मात्र एक नक्की आहे की काँग्रेस वाढणार नाही तर काँग्रेसच्या ठिकऱ्या उडून ती वेगवेगळ्या पक्षांमध्ये विलीन होईल, अशी टीका श्री. बन यांनी केली.