मुंबई : राज्यातील नद्या व नाल्यांच्या खोलीकरणाच्या कामांना गती देण्यासाठी शासन स्वतंत्र नवीन योजना आणणार असून, नागपूर व अमरावती जिल्ह्यांतील खोलीकरणाच्या कामांसाठी तातडीने मानक कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यात यावी, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले. या कामांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्याबाबतही निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीस जलसंधारण मंत्री संजय राठोड, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे तसेच महसूल व जलसंधारण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नागपूर व अमरावती विभागांतील अनेक नद्या आणि नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बाधित होत असून जलसाठा क्षमता कमी होत आहे. परिणामी भूजल पातळी, सिंचन व्यवस्था आणि पावसाळ्यातील पूरनियंत्रणावर विपरीत परिणाम होत असल्याच्या बाबींवर बैठकीत चर्चा झाली. यावर खोलीकरणाची कामे अधिक परिणामकारक आणि कालबद्ध पद्धतीने राबविण्यासाठी स्वतंत्र एसओपी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.