चिपळूण : चिपळूण नगरपरिषदेच्या हद्दीतील गोवळकोट प्रभागात गेल्या महिनाभरापासून नागरिकांना नळाद्वारे खारे व मचुळ पाणीपुरवठा होत असल्याने संतप्त झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने नगरपालिकेवर धडक देत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. शहरप्रमुख सचिन (भैय्या) कदम यांच्या नेतृत्वाखाली व गोवळकोट विभागप्रमुख संकेत शिंदे यांच्या पुढाकाराने झालेल्या या आंदोलनात्मक निवेदनामुळे नगरपरिषद प्रशासनाला नागरिकांच्या प्रश्नांवर खुलासा करावा लागला.

गोवळकोट हा चिपळूण नगरपरिषदेतील क्रमांक एकचा प्रभाग असून येथील पाणीटाकीतून शहरातील मोठ्या भागाला पाणीपुरवठा केला जातो. मात्र दरवर्षी एप्रिल, मे आणि जून महिन्यात गोवळकोटमधील नागरिकांना खाऱ्या व मचुळ पाण्याचा सामना करावा लागतो. यावर्षीही तीच परिस्थिती निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्यापासून स्वयंपाक, कपडे धुणे आणि दैनंदिन वापरासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक माता-भगिनींना उन्हात विहिरींवरून पाणी आणण्याची वेळ आली असून आरोग्याच्या समस्याही निर्माण होत आहेत.

निवेदन सादर करताना प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी संजय जाधव आणि पाणीपुरवठा विभाग प्रमुख खाडे उपस्थित होते.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे, माजी नगरसेवक व तालुका समन्वयक राजूशेठ देवळेकर, शहर सचिव प्रशांत मुळये, उपशहरप्रमुख राजू विखारे, राजन खेडेकर, मनोज पांचाळ विभागप्रमुख संकेत शिंदे, विकास गांगण, संतोष मिरगल, शाखाप्रमुख नवीनचंद्र किल्लेकर तसेच गोवळकोट प्रभागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.