देवरुख : देवरुख शहर व तालुक्यातील नागरिकांना जमिनीचे गट-बुक नकाशे उपलब्ध होत नसल्यामुळे घरबांधणी परवानगी तसेच विविध शासकीय घरकुल योजनांचा लाभ मिळवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरीचे जिल्हा उपाध्यक्ष व देवरुख नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष श्री. अभिजीत चंद्रकांत शेट्ये यांनी विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

देवरुख शहर व तालुक्यातील अनेक जमिनींचे गट-बुक नकाशे भूमिअभिलेख कार्यालयाकडून उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना घर बांधणीसाठी आवश्यक परवानग्या मिळवताना अडचणी येत आहेत. काही ठिकाणी जुने, जीर्ण अथवा अस्पष्ट नकाशे असल्याने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे कठीण होत आहे. परिणामी सर्वसामान्य नागरिकांची घरबांधणीची कामे रखडत आहेत.

या समस्येचा सर्वाधिक फटका गरीब व गरजू कुटुंबांना बसत असून, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना तसेच ग्रामीण भागातील विविध घरकुल योजनांमधून घरकुलाचा लाभ मिळालेल्या नागरिकांनाही आवश्यक कागदपत्रे व नकाशांच्या अभावामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरकुल मंजूर होऊनही प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात अडथळे निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन सदर प्रश्न येत्या विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित करण्यात यावा, तसेच देवरुख शहर व तालुक्यातील नागरिकांना गट-बुक नकाशे उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती अभिजीत शेट्ये यांनी आमदार प्रमोद जठार यांच्याकडे केली.

या प्रश्नामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता भूमिअभिलेख विभागामार्फत नकाशे उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुलभ करावी, जुने व जीर्ण नकाशे अद्ययावत करावेत आणि नागरिकांना वेळेत आवश्यक अभिलेख उपलब्ध होतील, अशी व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.

देवरुख शहर व तालुक्यातील जनतेचा हा महत्त्वाचा प्रश्न शासन स्तरावर पोहोचवून त्याच्या निराकरणासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे अभिजीत शेट्ये यांनी सांगितले.