बारामती – जिल्हा क्रीडा संकुल, पुणे अंतर्गत बारामती तालुक्यातील मौजे कटफळ येथे ८० हजार चौरस मीटर जागेवर उभारण्यात येणाऱ्या अतिरिक्त क्रीडा सुविधांच्या (टप्पा-३) कामाचे भूमिपूजन आज राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

आजचा दिवस बारामतीसह संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद आहे. आदरणीय अजितदादांनी बारामतीला आधुनिक क्रीडा सुविधांचे केंद्र बनवण्याचे स्वप्न पाहिले होते. क्रीडा संकुलाच्या टप्पा-१ आणि टप्पा-२ अंतर्गत अनेक सुविधा उभारण्यात आल्या असून, आता टप्पा-३ च्या माध्यमातून हे स्वप्न अधिक व्यापक स्वरूपात साकार होत आहे असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.

उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत या क्रीडा संकुलासाठी ८५ कोटी १३ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता मिळवून दिल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

या संकुलामुळे बारामतीच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळणार असून, तरुण खेळाडूंना आपले क्रीडा कौशल्य विकसित करण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. तरुणांना केवळ शिक्षणातूनच नव्हे, तर खेळातूनही आपले भविष्य घडवता आले पाहिजे. त्यासाठी त्यांना उत्तम दर्जाची मैदाने, आधुनिक क्रीडा सुविधा आणि सरावासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असेही सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.

या क्रीडा संकुलात राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन करणे शक्य होणार आहे. त्यामुळे बारामतीसह पुणे जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील प्रतिभावान खेळाडूंना याचा मोठा लाभ मिळेल, असा विश्वासही सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.

कामाच्या दर्जाशी आणि निर्धारित कालमर्यादेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही असे सांगतानाच आदरणीय अजितदादांना ज्या दर्जाचे काम अपेक्षित होते, त्याच गुणवत्तेचे काम निर्धारित वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावे. कामाच्या गुणवत्ता आणि कालावधीबाबत कोणतीही तडजोड करू नये, अशा स्पष्ट सूचना सुनेत्रा पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच खेळाडूंना केवळ क्रीडा सुविधा उपलब्ध करून न देता त्यांच्या प्रशिक्षणासाठी, निवासासाठी वसतीगृह, सकस आहार आणि इतर आवश्यक सोयी-सुविधांचीही योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले.

अजितदादांनी पाहिलेले बारामतीच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि नव्या पिढीला क्रीडा क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही सुनेत्रा पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.