चिपळूण : भारतीय जनता पक्षाच्या चिपळूण शहर मंडलाच्या अध्यक्षपदी मकरंद ऊर्फ आशिष चंद्रकांत खातू यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली.
नगरसेवक म्हणून काम करताना शहराच्या विकासासाठी योगदान देणारे आणि यापूर्वीही चिपळूण भाजपच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेले आशिष खातू यांना संघटनात्मक कामाचा अनुभव आहे. याच अनुभवाचा विचार करून पक्षाने त्यांच्यावर पुन्हा महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
चिपळूण शहरात भाजपची संघटना अधिक बळकट करणे, बूथ स्तरावर पक्षाचा विस्तार करणे, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढवणे आणि पक्षाचे उपक्रम नागरिकांपर्यंत पोहोचवणे, ही प्रमुख आव्हाने त्यांच्यासमोर असतील.
निवडीनंतर आशिष खातू यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांचे आभार मानले. वरिष्ठांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची विचारधारा शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
