मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिळक भवन येथे घेतलेल्या बैठकीत महाराष्ट्रातील वाढवण बंदर, मोरबे प्रकल्प, तिसरी आणि चौथी मुंबई, बुलेट ट्रेन आणि अणुउर्जा अशा वेगवेगळ्या प्रकल्पांना विरोध करण्याची रणनिती ठरवण्यात आली. हर्षवर्धन सपकाळ, धनंजय शिंदे आणि दीपक पवार यांच्यात ही चर्चा झाली असून टोरंट प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात होत असलेल्या विरोधही याच बैठकीनंतर ठरला. सुपारी घेऊन, पैसे देऊन आंदोलन उभे करायचे आणि महाराष्ट्रात हे प्रकल्प रद्द झाले, की ते प्रकल्प त्यांचे सरकार असलेल्या कर्नाटक आणि तेलंगणात घेऊन जायचे हा हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसचा डाव आहे आणि हा त्याचा पुरावा आहे, असा घणाघाती आरोप करत भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी या बैठकीचे छायाचित्रच बुधवारी सादर केले. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विनीत पाटील, हेमंत ओंबरे, सृष्टी अपूर्वा, सत्यजित चव्हाण, डॉ. मंगेश सावंत, दिनेश राणे, मिलिंद राऊत, स्वप्निल तरी, देवेंद्र तांडेल, दीपक पवार, उमेश तांडेल अशा लोकांच्या माध्यमातून पर्यावरणाचे नाव पुढे करत या प्रकल्पांना विरोध करायचा, अशी भूमिका घेतली जात आहे. मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढल्याने मुंबईत आता राहायला जागा नसल्याने सरकार तिसरी आणि चौथी मुंबई सुरू करत आहे, तर त्याला विरोध करण्याची योजनाही या बैठकीत आखण्यात आली. देशातले सगळ्यात मोठे वाढवण बंदर आणि त्याद्वारे 70,000 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार आहे. या बंदराला विरोध करण्याचा डावही याच बैठकीत रचण्यात आला. त्यामुळे पर्यावरणवाद्यांचे नाव पुढे करत स्वतःचा राजकीय अजेंडा पार पाडायचा, या काँग्रेसच्या धोरणाची पोलखोल या निमित्ताने झाली आहे, असल्याचा आरोप श्री. बन यांनी केला.
मात्र महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. तुम्ही कितीही विरोध केला, तरी हे प्रकल्प महाराष्ट्राच्या हिताचे असल्याने तुमचा विरोध सफल होणार नाही. महाराष्ट्र अशा चांगल्या प्रकल्पांच्या पाठीशी निश्चितपणे उभा राहील, असा विश्वास श्री. बन यांनी व्यक्त केला.
मत पत्रिकेवर निवडणूक झाली तर हुकूमशाहीचा पराभव होतो, असा दावा जनाब संजय राऊत करतात. पण बॅलेट पेपरवर झालेल्या पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत पुण्यात उबाठा गटाचे सुनील मोदी यांना फक्त 3,066 तर छत्रपती संभाजीनगरात दिलीप घुगे यांना 8,000 मते मिळाली. बॅलेट पेपरवर निवडणूक झाल्यानंतरही पाचपैकी तीन ठिकाणी महायुती आघाडीवर आहे. कर्नाटकातही शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत भाजपा आणि एनडीएला चार जागा मिळाल्या. त्यातील तीन जागा एकट्या भाजपाच्या आहेत. ही तुमची लायकी आणि ही तुमची पात्रता, असे श्री. बन यांनी सुनावले.

संजय राऊतांनी शिक्षकांचा अपमान केला

शिक्षकांनी 10-10 हजार रुपयांना मते विकली, असे म्हणत संजय राऊत हे शिक्षकांचा अपमान करताहेत. हा महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षकांचा अपमान आहे आणि शिक्षक याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत. मध्यंतरी लाडक्या बहिणींचा अपमान केला, आता शेतकऱ्यांचा अपमान करताहात. अपमान करण्याची सवयच आहे. मग जिथे पुण्यामध्ये पदवीधरच्या निवडणुकीत आणि छत्रपती संभाजीनगरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे उमेदवार जिंकले आहेत, तिथे त्यांनी पैसे देऊन मते विकत घेतली का, हे एकदा महाराष्ट्राला सांगा सांगा. नाचता येईना, अंगण वाकडे, कोल्ह्याला द्राक्षे आंबट, संजय राऊत, आपल्या पक्षाची अवस्था बघा आणि मग इतरांवर टीका करा, अशा शब्दात श्री. बन यांनी फटकारले.