रत्नागिरी : मुख्य निवडणूक आयुक्त मा. ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांची आवश्यक ती दखल घेऊन घटनात्मक व कायदेशीर चौकटीत कार्यवाही करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली. पक्षाचे रत्नागिरी तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील यांच्या नेतृत्वाखाली मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, रत्नागिरी तसेच मा. उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी, रत्नागिरी उपविभाग यांच्याकडे सादर करण्यात आले.
दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी ‘द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा संदर्भ देत निवेदनात म्हटले आहे की, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या दहा महिन्यांत निवडणूक आयोगाच्या निर्णयप्रक्रियेबाबत किमान १४ लेखी आक्षेप नोंदविल्याचे वृत्त आहे. हे आक्षेप नवीन मतदार नोंदणी, नावे वगळणे व पुनर्स्थापित करणे, Form-6 मधील बदल, मतदार यादीच्या IT प्रणालीचे केंद्रीकरण आणि अपील प्रक्रिया यांसारख्या बाबींशी संबंधित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच गोव्यात स्थानिक Electoral Registration Officers यांनी पात्र ठरवलेल्या ९७ मतदारांच्या प्रकरणात सॉफ्टवेअरशी संबंधित अडचणीमुळे त्यांची नावे अंतिम मतदार यादीत राहिली नसल्याचे वृत्तही निवेदनातून निदर्शनास आणण्यात आले. या सर्व बाबींची कायदेशीर व तांत्रिक तपासणी करून निर्णयप्रक्रिया पारदर्शकपणे जनतेसमोर आणावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, संबंधित वृत्ताच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने निर्णयप्रक्रिया ही संस्थात्मक अंतर्गत चर्चेचा भाग असून मागील वर्षातील निर्णय एकमताने झाल्याचे स्पष्ट केले आहे.
निवेदनात १४ लेखी आक्षेप व त्यावरील कार्यवाहीची स्वतंत्र तपासणी, Form-6 मधील बदल व IT प्रणालीच्या केंद्रीकरणाची चौकशी, ९७ मतदारांच्या प्रकरणाची तपासणी आणि त्रुटी आढळल्यास घटनात्मक व कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. तसेच मा. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी सक्षम घटनात्मक प्राधिकरणाकडे विचारार्थ मांडावी आणि मतदार यादी व निवडणूक प्रक्रियेबाबत आवश्यक माहिती व निर्णयांची कारणमीमांसा जनतेसमोर पारदर्शकपणे आणावी, अशी मागणीही करण्यात आली.
शहर प्रमुख प्रशांत सांळूके, उप तालुका प्रमुख विजय देसाई, शहर महिला आघाडी प्रमुख सेजल बोराटे, उप शहर प्रमुख सलिल डाफळे, उप शहर प्रमुख नितिन तळेकर, शिरगांव विभाग प्रमुख महेश नेवरेकर, राजाराम राहाटे, बंड्या सुर्वे, श्री. रांगणकर, महिला विभाग संघटक हिना दळवी आदी पदाधिकारी व शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
