लांजा: नगरपंचायतीने एकल वापर प्लास्टिक विरोधात धडक मोहीम राबवत शहरातील विविध व्यावसायिक आस्थापनांवर कारवाई केली. या मोहिमेत तब्बल १९ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून एकूण २ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
मंगळवार २ जून रोजी लांजाच्या आठवडा बाजारात नगरपंचायतीच्या पथकाने शहरातील मुख्य बाजारपेठ, रस्त्यावरील विक्रेते, भाजीपाला मंडई, फुल विक्रेते तसेच हॉटेल व्यवसायिकांची तपासणी केली. या तपासणीत प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर होत असल्याचे आढळून आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात आली.
नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने ही मोहीम राबविण्यात आली. सध्या करण्यात आलेली कारवाई ही प्राथमिक स्वरूपाची असून भविष्यात प्लास्टिक बंदीच्या नियमांची अधिक कठोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे नगरपंचायत प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सध्या कारवाई करताना २०० रुपये प्रमाणे दंड आकारण्यात आला. मात्र यापुढे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून किमान ५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार असल्याचा इशाराही नगरपंचायत प्रशासनाने दिला आहे.
या मोहिमेत नगरपंचायतीचे स्वच्छता निरीक्षक सुरज जाधव, शहर समन्वयक रोहित कराळे, वरिष्ठ लिपिक प्रज्ञा जेधे, प्रमोद जाधव, लिपिक संजय गुरव, संतोष आग्रे, व्हॉलमन रंजना खेडेकर, डाटा ऑपरेटर युवराज मांडवकर, विनीत आंबेकर, शिल्पा लांजेकर, मुकादम रविंद्र कांबळे, शिपाई राजकुमार कुंभार तसेच सफाई कर्मचारी राजेश कुंभार, बाबल्या पवार आदींनी सक्रिय सहभाग घेतला.
