मुंबई : भाजपाचा उल्लेख बकासुर असा करत जनाब संजय राऊत महाभारतात गेलेच आहेत तर त्यांना इतकेच सांगायचेय की तुम्ही दुर्योधनाबरोबर आहात आणि स्वतः दु:शासनाच्या भूमिकेत आहात. महाभारतातील दु:शासनाप्रमाणे तुम्ही वागत आहात. ज्यांचे नाव राघव आहे ते दुर्योधन आणि दु:शासनासोबत नव्हे तर ते पांडवासोबतच राहतील.
राहुल गांधींसारख्या दु:शासनासोबत किंवा अहंकारी अरविंद केजरीवालसोबत राहण्यापेक्षा राघव चढ्ढा यांच्यासह सात खासदारांनी भाजपात राहणे पसंत केले. ज्यांच्यासोबत धर्म आहे त्यांच्यासोबत पांडव असतात. दु:शासन होऊन कशा पद्धतीने आपण महिलांवर टीका करतो आणि पाटकर नावाच्या भगिनीचा छळ केला एकदा जनतेला सांगा, अशा शब्दात शनिवारी भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रहार केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. बन बोलत होते.
श्री. बन पुढे म्हणाले, निवडणूक आयोग नेमका कुठला डबा आहे हे सांगण्याच्या भानगडीत संजय राऊत यांनी पडू नये. जनतेने तुम्हाला डस्टबिन म्हणून वापरले. उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे, प्रियंका चतुर्वेदी तुम्हाला डस्टबिन म्हणून वापरतात. कधी कधी राहुल गांधी तुम्हाला डस्टबिन म्हणून वापरतात याचा विचार करा. महाराष्ट्रामध्ये उबाठा गट डबा झालाय. कोणीही वापरतो आणि फेकून देतो अशी अवस्था संजय राऊत तुमची झाली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगावर टीका करणे हे सोडून द्या.
