मुंबई : राज्यातील 65 टक्के लोकसंख्या असलेली 35 वर्षांच्या आतील युवाशक्ती संघटित करून आपण ती एका दिशेने नेऊ शकलो तर युवाशक्ती जागर यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात एक मोठे परिवर्तन होऊ शकेल. राज्यात मोठ्या प्रमाणात अराजकता वाढवणाऱ्या अर्बन नक्षलवादासारख्या शक्ती युवकांमध्ये विष पेरण्याचे काम करत आहेत आहेत. या युवकांचे मत संविधानाविरुद्ध कलुषित करण्याचे कारस्थान चाललेले आहे.
या युवकांना संविधानाने तयार केलेल्या व्यवस्थेप्रती जागृत करण्याचे काम भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आयोजित करण्यात आलेली ही यात्रा पार पाडेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केला. भारतीय जनता युवा मोर्चाच्या युवाशक्ती जागर यात्रेचा प्रारंभ करताना श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी युवा शक्ती जागर यात्रेत काढण्यात आलेल्या कार रॅलीला हिरवा झेंडा दाखवला.
येत्या काळात भाजपाचा युवा मोर्चा पहिल्या क्रमांकाचा झाला पाहिजे, याच दिशेने आपले प्रयत्न सुरु असल्याचे सांगून युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक म्हणाले, युवा मोर्चा समाजातील सर्व थरातील युवकांपर्यंत पोहोचावा यासाठी केवळ राज्यातीलच नव्हे तर केंद्रातील मंत्रीमहोदय, पदाधिकारी आणि विद्यार्थी चळवळीतील मंडळींचे मार्गदर्शन घेत आहे. युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि नेत्यांनी अतिशय परिश्रम घेऊन या युवाशक्ती जागर यात्रेची आखणी केली असल्याने संपूर्ण राज्यातील युवावर्ग या यात्रेशी जोडला जाणार आहे.
