खेड (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष श्री. स. तु. कदम आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस संजय सावंत यांनी त्यांच्या समर्थकांसह गुरुवार, दि. ९ एप्रिल २०२६ रोजी शिवसेना नेते रामदासभाई कदम, गृहराज्यमंत्री ना. योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश समारंभ जामगे येथील निवासस्थानी पार पडला.

गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम हे दापोली मतदारसंघात करत असलेल्या विकासकामांची भुरळ अनेकांना पडली असून, त्यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून अनेकजण शिवसेनेत प्रवेश करत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्राध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर श्री. स. तु. कदम यांनी केलेल्या पक्षप्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार, यात शंका नाही.

यावेळी शिवसेना उपनेते माजी आमदार संजय कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख आणि जि. प. सदस्य किशोर देसाई यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.