रत्नागिरीत : पक्षफुटीच्या चर्चांवर भाष्य करताना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सूचक वक्तव्य केले आहे. “जे घडणार आहे ते घडणारच आहे, पण त्यासाठी आपल्याला कार्यक्रम हाती घ्यावा लागेल, काही निर्णय घ्यावे लागतील आणि काही भूमिका ठरवाव्या लागतील,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचा संदेश दिला. तसेच “उद्धव साहेब डरो मत, चिंता करू नका,” असे म्हणत त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

पक्षफुटीच्या चर्चांबाबत बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, गेल्या दीड वर्षापासून अफवांचे वातावरण निर्माण केले जात आहे. ज्यांच्या नावाने पक्षफुटीच्या चर्चा सुरू आहेत त्यांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगली पाहिजे. विचारधारेसाठी नव्हे तर छळवादातून सुटका व्हावी म्हणून पक्षांतर होत असल्याचा आरोप त्यांनी केला. पक्ष फोडण्याचे राजकारण करणाऱ्यांवर टीका करत त्यांनी देशातील जनतेने याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले.

यावेळी त्यांनी पक्षांतरबंदी कायद्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “पक्षांतरबंदी विरोधी कायदा संपवून टाका, हे माझे आव्हान आहे,” असे वक्तव्य केले. तसेच लोकसभा अध्यक्षांना कोणते पत्र देण्यात आले यापेक्षा पक्षफोडीच्या प्रवृत्तीला आळा घालणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.