चिपळूण : राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने अद्याप हजेरी न लावल्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी सभापती पंचायत समिती चिपळूण शौकतभाई मुकादम यांनी यंदाचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरवर्षी १९ जून रोजी त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो. मात्र यंदा पावसाअभावी अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी केलेली पेरणी पावसाच्या प्रतीक्षेत असून ती वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच वृक्षवाटप, वृक्षलागवड आणि विविध फळझाडांच्या बियांची पेरणीही ठप्प झाली आहे. ग्रामीण भागात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

या संकटाच्या काळात वाढदिवस साजरा करणे योग्य वाटत नसल्याचे सांगत शौकतभाई मुकादम यांनी नागरिकांना त्यांना भेटण्यासाठी येऊ नये, तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे.

“आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्यापर्यंत पोहोचले आहेत. सध्या आपण सर्वांनी एकत्र येऊन चांगल्या पावसासाठी ईश्वराकडे प्रार्थना करूया,” असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.