चिपळूण -नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुन्हा एकदा नागरिकांच्या मदतीला धावून आली असून, बाळकृष्ण नगर, रॉयल अपार्टमेंट, सहारा अपार्टमेंट आणि दलवाई प्लाझा परिसरातील रहिवाशांच्या गंभीर पाणी निचरा समस्येवर अखेर सकारात्मक तोडगा निघाला आहे.
सदर परिसरातील नागरिकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिपळूण शहर प्रमुख सचिन उर्फ भैय्या कदम यांच्याकडे अनधिकृत बांधकामामुळे नैसर्गिक पाणी निचरा बंद झाल्याची तक्रार केली होती. बांधकामासाठी करण्यात आलेल्या भरावामुळे सांडपाणी व पावसाचे पाणी साचून राहत असल्याने परिसरात दुर्गंधी, डासांची वाढ आणि नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.