लोटे : खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरातील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीविरोधात कोकण नागरी संघर्ष समिती आणि स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा आज १२९ वा दिवस पूर्ण झाला. कंपनीमध्ये पीफास (PFAS) संबंधित उत्पादन होत असल्याचा आरोप करत ही कंपनी बंद करण्याच्या मागणीसाठी आंदोलक गेल्या चार महिन्यांहून अधिक काळापासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करत आहेत.
दरम्यान, राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या खाजगी दौऱ्यानिमित्त लोटे एमआयडीसी परिसरात आल्या असता आंदोलकांनी त्यांची भेट घेऊन आपल्या मागण्या आणि आंदोलनामागील भूमिका त्यांच्यासमोर मांडली. आंदोलकांचे म्हणणे ऐकल्यानंतर मंत्री मुंडे यांनी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांची दखल घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच, आंदोलकांच्या शिष्टमंडळाची मंत्रालयात लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये काही प्रमाणात आशावाद निर्माण झाला असला तरी कंपनी बंद होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.