चिपळूण : तालुका, जिल्हा रत्नागिरी येथे कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम, शेतकरी सक्षमीकरण आणि ग्रामीण परिवर्तनासाठी सातत्याने कार्यरत असलेले सहाय्यक कृषी अधिकारी श्री. विजय साळुंके यांची ‘तिफन कृषी गौरव पुरस्कार 2025’ साठी निवड झाली आहे. कृषी विभागातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.

विजय साळुंके यांनी शेतकऱ्यांसाठी विविध शासकीय योजना, गटशेतीचे उपक्रम तसेच कीड व्यवस्थापन व पीक संरक्षणासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवले आहेत. शेतकरी शिक्षणासाठी मराठी भाषेत सुलभ मार्गदर्शक, दृश्य साधने, सोशल मीडिया क्लिप्स आणि प्रात्यक्षिके यांचा प्रभावी वापर करून त्यांनी ग्रामीण भागात कृषी ज्ञानाचा प्रसार केला आहे.

या पुरस्कारामुळे शेतकरीहितासाठी केलेल्या त्यांच्या कार्याला मान्यता मिळाली असून ग्रामीण विकासासाठी नवे मार्गदर्शन मिळणार आहे. पुरस्कार सोहळा आगामी काही दिवसांत पार पडणार असून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान प्रदान केला जाणार आहे.

विजय साळुंके यांनी सांगितले की, “हा पुरस्कार माझ्या वैयक्तिक कार्याचा नसून शेतकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव आहे. शेतकरी सक्षमीकरण आणि नैसर्गिकरीत्या गटशेतीसाठी माझे प्रयत्न पुढेही सुरू राहतील.”