लांजा : स्ते अपघात टाळण्यासाठी लांजा पोलीसांनी पुढाकार घेतला असून ऑपरेशन टेप फॉर सेफ अभियानांतर्गत अवजड वाहनांवर रिफ्लेक्टर बसविण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार महामार्ग ठेकेदार कंपनीच्या कार्यरत डंपरवर लाल रंगाचे चेतावणी कापड व रिफ्लेक्टर बसविण्यात आले.

मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करणे तसेच अवजड वाहन चालक व वाहन मालकांमध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती करण्याच्या उद्देशाने रत्नागिरी पोलीस दलाने ऑपरेशन टेप फॉर सेफ अभियानांतर्गत अवजड वाहनांच्या सुरक्षा उपाययोजनांवर भर दिला आहे. या मोहिमेअंतर्गत ट्रक, बस, ट्रॅक्टर व इतर अवजड वाहनांवरील टेल लाईट, ब्रेक लाईट, पार्किंग लाईट तसेच रिफ्लेक्टर सुस्थितीत ठेवण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिले आहेत.

या अभियानाचा भाग म्हणून लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा पोलीसांनी मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा येथे काम करणारी ठेकेदार ईगल इन्फ्रा कंपनीच्या डंपर चालकांशी संवाद साधत रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. तर रात्रीच्या वेळी अवजड वाहने स्पष्ट दिसण्यासाठी रिफ्लेक्टरचे महत्त्व, टेल लाईट कार्यरत ठेवण्याची आवश्यकता आणि वाहन सुरक्षितपणे उभे करण्याच्या नियमांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक यावेळी दाखविण्यात आले.

यावेळी ईगल इन्फ्रा कंपनीच्या कार्यरत डंपरवर लाल रंगाचे चेतावणी कापड व रिफ्लेक्टर बसविण्यात आले. तर सध्या दहा डंपर वाहने सेवेत असून उर्वरित नादुरुस्त वाहनांची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर त्यांवरही अशाच प्रकारची सुरक्षा साधने बसविण्यात येतील असे सांगण्यात आले.

दरम्यान, मोहीमेवेळी लांजा पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले, श्रेणी उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे, म.पो.हे.उर्मिला शेडे, कॉन्स्टेबल पूजा चव्हाण, कॉन्स्टेबल सुरज नाईकवडे तसेच ईगल इन्फ्रा कंपनीचे डंपर चालक व कर्मचारी उपस्थित होते.