चिपळूण : प्रतिवर्षीप्रमाणे श्री लक्ष्मी केशव देवस्थान, शिरवळ मालघरतर्फे यावर्षीही चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्यापासून श्री राम नवमीपर्यंत श्री राम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवान्तर्गत आज, गुरुवार, दिनांक २६ मार्च २०२६ रोजी श्री रामजन्माप्रीत्यर्थ सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत श्रींच्या जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी ह.भ.प. श्रीमती बिवलकर यांचे जन्मोत्सवाचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर सर्वांना श्रींचा प्रसाद व पन्हे वाटप करण्यात येणार असून, श्री लक्ष्मी केशव परिवारातील यशस्वी रामभक्तांचा सन्मान करण्यात येणार आहे.
याच दिवशी रात्री ठीक साडेदहा वाजता ज्येष्ठ गायिका कै. माणिक वर्मा यांच्या माणिक गीतांचा बहारदार कार्यक्रम सातारा येथील कलाकार सादर करणार आहेत.
दिनांक २७ मार्च, शुक्रवार २०२६ रोजी दुपारी श्रींचा महाप्रसाद होणार असून, रात्री श्री लक्ष्मी केशव परिवारातील विविध कलाकारांचा गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या या उत्सवाची सांगता २८ मार्च २०२६ रोजी पहाटे ललिताचे कीर्तन होऊन होणार आहे. तरी सर्व रामभक्तांनी या कार्यक्रमांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.