चिपळूण : दिवाळीच्या सुट्टीत ऐतिहासिक किल्ल्यांच्या आकर्षक प्रतिकृती साकारून आपल्या सृजनशीलतेचा आणि इतिहासप्रेमाचा परिचय देणाऱ्या बालगोपाळांचा कौतुक सोहळा चिपळूण येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या खंड शाखेतर्फे नुकताच उत्साहात पार पडला. बालवयातच छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास, गडकिल्ल्यांचे महत्त्व आणि हिंदवी स्वराज्याची प्रेरणा मुलांमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक पूजनीय डॉ. हेडगेवार आणि श्री. गोळवलकर गुरुजी यांच्या प्रतिमांना प्रमुख अतिथी प्रकाश गांधी गुरुजी, अशोकराव घेवडेकर, सुहास चव्हाण, कैसर देसाई, तृप्ती कदम आणि समीर कोवळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी अमित पाटणकर यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, दिवाळीच्या सुट्टीत चिपळूण शहरातील विविध भागांमध्ये मुलांनी अतिशय आत्मीयतेने, कल्पकतेने आणि सृजनशीलतेने छोट्या-मोठ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या आहेत. बालगोपाळांच्या या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी संघ शाखेतर्फे दरवर्षी त्यांचा कौतुक सोहळा आयोजित केला जातो.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणेतून भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
निसर्ग व पर्यटन अभ्यासक समीर कोवळे यांनी किल्ल्यांचा अभ्यास कसा करावा, ऐतिहासिक गडकोटांचे महत्त्व काय आहे आणि किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करण्यामागील उद्देश कोणता, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. किल्ल्यांची रचना, त्यांचा इतिहास आणि भौगोलिक वैशिष्ट्ये समजून घेण्याचे महत्त्व त्यांनी विशद केले. तसेच आपल्या विविध निसर्गभ्रमंती आणि किल्ले अभ्यास मोहिमांमध्ये मुलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. सुहास चव्हाण यांनीही सहभागी बालगोपाळांना मौलिक मार्गदर्शन केले.

अशोकराव घेवडेकर यांनी आपल्या मनोगतात मुलांनी शालेय अभ्यासाबरोबरच मैदानी खेळ आणि ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करण्यासारखे छंद जोपासावेत, असे सांगितले. कैसर देसाई यांनी मुलांच्या कल्पकतेला वाव देणारे उपक्रम आणि छंद विकसित होण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले. तृप्ती कदम यांनी किल्ले प्रतिकृती साकारण्यात मुलांप्रमाणेच मुलीही उत्साहाने पुढाकार घेत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मुलींच्या या सहभागाचे त्यांनी विशेष कौतुक केले.

या वेळी सहभागी बालगोपाळांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी साकारलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृतींची माहिती दिली. किल्ले उभारण्यामागील संकल्पना, त्यासाठी केलेले नियोजन, वापरलेले साहित्य आणि त्यातून मिळालेला आनंद याविषयी त्यांनी अनुभव कथन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध निवेदक प्रकाश गांधी गुरुजी यांनी या कौतुक सोहळ्याचे आयोजन केल्याबद्दल संघाच्या खंड शाखेचे विशेष आभार मानले. ते म्हणाले की, शाळेत असताना आपण भारताची प्रतिज्ञा घेतो. देश, आपली भूमी आणि राष्ट्रपुरुषांविषयीचे प्रेम प्रत्यक्ष कृतीतून व्यक्त होताना आज या कार्यक्रमात पाहायला मिळाले. राष्ट्रपुरुषांनी केलेले राष्ट्ररक्षणाचे क्रांतिकारी कार्य आणि ऐतिहासिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी मुलांमध्ये इतिहासविषयक पुस्तके वाचनाची आवड निर्माण करणे आवश्यक आहे. चिपळूण शहरातील ग्रंथालयांमध्ये राष्ट्रप्रेम आणि इतिहासाची माहिती देणारी अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. मुलांनी ग्रंथालयात जाऊन विविध विषयांवरील पुस्तके वाचावीत आणि आपल्या ज्ञानात भर घालावी.

किल्ल्यांची प्रतिकृती तयार करताना मातीशी नाते जोडावे लागते. माती, दगड, विटा आणि पाणी यांचा योग्य वापर करून किल्ल्याची उभारणी करावी लागते. त्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या छोट्या मूर्ती ठेवून प्रतिकृतीला जिवंत स्वरूप देण्याचा प्रयत्न ही केवळ कलाकृती नसून राष्ट्रप्रेम व्यक्त करण्याची एक सुंदर कृती आहे. बालगोपाळांनी आपल्या कृतीतून हा आदर्श घालून दिला आहे. याबद्दल सर्व सहभागी मुले आणि त्यांच्या पालकांचे त्यांनी अभिनंदन केले. आपल्या मनोगतात त्यांनी विविध ऐतिहासिक घटनांचे दाखले देत इतिहासातील प्रेरणादायी प्रसंग जिवंत स्वरूपात उलगडून सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व बालगोपाळ आणि पालकांना दिवाळी फराळासह कोकणातील सातही जिल्ह्यांमधील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती देणारे आकर्षक माहितीपत्रक आणि पेन सस्नेह भेट देण्यात आले. अशा उपक्रमांमुळे मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच इतिहासाची आवड, राष्ट्रप्रेम आणि सांस्कृतिक वारशाविषयीची जाणीव अधिक दृढ होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.