चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर चिपळूण प्रांत कार्यालय ते कापसाळ विश्रामगृह या सुमारे एक किलोमीटरच्या अंतरात उड्डाणपूल उभारण्यात यावा, अशी मागणी चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीच्या चिपळूण शाखा क्रमांक 1 च्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात समितीचे अध्यक्ष सियाराम जाधन यांनी पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदन दिले आहे.
या कामाचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, चिपळूण यांच्यामार्फत राष्ट्रीय महामार्ग विभाग, रत्नागिरी येथील कार्यकारी अभियंत्यांकडे सादर करण्यात आला आहे. त्यानंतर 20 जानेवारी 2026 रोजी नियोजित उड्डाणपुलाचा नकाशा आणि खर्चाच्या अंदाजपत्रकासह सविस्तर प्रस्ताव कोकण भवन, नवी मुंबई येथील राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्य अभियंत्यांकडे पाठविण्यात आला. मात्र, हा प्रस्ताव गेल्या 11 महिन्यांपासून प्रलंबित असून अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे समितीने पालकमंत्री ना. सामंत यांच्या निदर्शनास आणून लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी विनंती केली आहे. अन्यथा उपोषण व रास्ता रोको केला जाईल असा इशारा दिला आहे.
राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण शहराच्या हद्दीपासून कापसाळ विश्रामगृहापर्यंत सुमारे तीन किलोमीटरचे अंतर आहे. यापैकी दोन किलोमीटर अंतरात उड्डाणपूल झाला असून, प्रांत कार्यालय ते कापसाळ विश्रामगृह या उर्वरित एक किलोमीटरच्या टप्प्यात अद्याप उड्डाणपूल झालेला नाही. त्यामुळे या परिसरातील सुमारे 20 ते 30 हजार नागरिकांना वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
या महामार्गालगत महाविद्यालये, हायस्कूल, मराठी शाळा, जिल्हा न्यायालय, पोलीस ठाणे, तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, सिटी सर्व्हे कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय आणि एसटी महामंडळाची सुविधा असल्याने या मार्गावर नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन प्रांत कार्यालय ते कापसाळ विश्रामगृहापर्यंत उड्डाणपूल उभारण्याबाबत पालकमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालून तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हे निवेदन उज्वला जाधव, मदाकिनी मोहिते, राजेश्री जाधव, भारती सकपाळ, निधी जाधव, सूनिता जाधव, दिप्ती कदम, पर्वा जाधव, राखी जाधव, निकिता जाधव, प्रिती मोहिते, प्रतिभा सकपाळ, स्नेहा गमरे, प्रतिक्षा तांबे, उमा कदम, निलम गायकवाड, अनिता मोहिते, ललिता मोहिते, स्मिता जाधव यांनी दिले. यावेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ, राजू जाधव, डॉ. अशोक सकपाळ, प्रशांत मोहिते, राजेंद्र जाधव, तुळशीराम जाधव, विलास सकपाळ, विलास जाधव, आदी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांची प्रस्तावाच्या विलंबाबाबत नाराजी
याउड्डाणपुलाचा प्रस्ताव गेल्या 11 महिन्यांपासून अधीक्षक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग परिमंडळ, कोकण भवन, नवी मुंबई यांच्याकडे प्रलंबित असल्याबद्दल पालकमंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली. याप्रकरणी त्यांनी तातडीने दूरध्वनीद्वारे संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी दिल्ली येथे पाठविण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे उड्डाणपुलाच्या मागणीला आता गती मिळण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
