चिपळूण : आमदार शेखर निकम यांचे विश्वासू सहकारी व माजी पंचायत समिती सभापती श्री. विजयराव गुजर यांची जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. खास बाब म्हणून झालेल्या या नियुक्तीमुळे चिपळूण तालुक्यातून या समितीवर संधी मिळालेले ते एकमेव सदस्य ठरले आहेत.
विजयराव गुजर यांच्या नियुक्तीबाबत स्व. अजितदादा पवार यांनी आमदार शेखर निकम यांना शब्द दिला होता. अजितदादांच्या निधनानंतरही हा शब्द पूर्ण व्हावा, यासाठी आमदार निकम यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
आमदार निकम यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. सुनेत्राताई पवार व ना. एकनाथ शिंदे, पालकमंत्री ना. उदय सामंत, ना. चंद्रशेखर बावनकुळे तसेच खासदार श्री. सुनील तटकरे यांच्याकडे हा विषय मांडला. सर्वांच्या सकारात्मक सहकार्याने अखेर विजयराव गुजर यांची नियुक्ती झाली.
निष्ठावंत सहकाऱ्याला दिलेला शब्द पूर्ण करून आमदार शेखर निकम यांनी पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वातील विश्वास आणि कार्यकर्त्यांप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित केली आहे. या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
