रत्नागिरी : मुंबई विद्यापीठ आणि विद्यार्थी यांच्यातील दुवा म्हणून काम करण्याची जबाबदारी असलेल्या सिनेट सदस्यांनी केवळ विद्यापीठाच्या बैठकीपुरते मर्यादित न राहता थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्या विद्यापीठाच्या पातळीवर मांडणे, हीच लोकशाही प्रतिनिधित्वाची खरी कसोटी आहे. याच भूमिकेतून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित युवा सेनेच्या मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात ‘विद्यार्थी संवाद यात्रा’ राबवत विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला.
या यात्रेत मुंबई विद्यापीठाचे सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य मिलिंद साठम, डॉ. धनराज कोहचाडे, एड. अल्पेश भोईर, स्नेहा गवळी आणि मयूर पांचाळ यांनी विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या समस्या, तक्रारी व शैक्षणिक अडचणी जाणून घेतल्या. यावेळी युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य प्रद्युम्न माने उपस्थित होते.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विद्यार्थी संवाद यात्रा पार पडली. रत्नागिरी जिल्हाप्रमुख श्री. दत्ताजी कदम व उपजिल्हाप्रमुख श्री. रविंद्र डोळस यांच्या सहकार्याने आणि नियोजनातून ही यात्रा यशस्वीपणे पार पडली.
श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालय, लांजा येथे विद्यार्थ्यांनी सिनेट सदस्यांशी थेट संवाद साधला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष जयवंत शेट्ये, सचिव महेश सप्रे आणि प्राचार्य देऊसकर यांनीही चर्चा केली. त्यानंतर रत्नागिरीतील माजी खासदार व शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या नाचणे रोड येथील कार्यालयात पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेण्यात आली. रत्नागिरी येथील मुंबई विद्यापीठाच्या सब-कॅम्पसमध्ये प्राचार्यांसोबत बैठक घेऊन स्थानिक पातळीवरील शैक्षणिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, साडवली, संगमेश्वर येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. तर चिपळूण येथील डी. बी. जे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर प्राचार्य डॉ. एम. एस. बापट यांच्याशीही सिनेट सदस्यांनी शैक्षणिक प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या प्लेसमेंटच्या संधी, रोजगाराभिमुख व करिअर-केंद्रित अभ्यासक्रम तसेच विद्यार्थ्यांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत विचारणा करण्यात आली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच कौशल्य व रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी विद्यापीठ स्तरावर आवश्यक पाठपुरावा करण्याबाबतही चर्चा झाली.
यावेळी महाराष्ट्र प्राध्यापक सेनेचे कोकण विभागीय अध्यक्ष डॉ. सत्येंद्र विजय राजे यांनी विविध बाबींवर चर्चा केली.
नवीन परीक्षा पद्धतीपासून निकालातील ‘Absent-Held’पर्यंत प्रश्नांचा पाढा
विद्यार्थ्यांनी नवीन परीक्षा पद्धती, अंतर्गत परीक्षा, क्रेडिट प्रणाली, निकाल जाहीर होण्यास होणारा विलंब, निकालातील तांत्रिक त्रुटी, परीक्षा देऊनही ‘Absent’ दाखविणे, काही विषयांचे निकाल ‘Held’ ठेवणे, प्रमाणपत्रे मिळण्यास होणारा विलंब तसेच काही महाविद्यालयांतील स्वच्छतागृहांच्या अस्वच्छतेच्या समस्या सिनेट सदस्यांसमोर पोटतिडकीने मांडल्या.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत लागू झालेल्या बदलांमुळे वारंवार होणाऱ्या अंतर्गत परीक्षा आणि क्रेडिट प्रणालीमुळे विद्यार्थ्यांवरील ताण वाढत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. तसेच ऐनवेळी अभ्यासक्रमात होणारे बदल, एकाच वेळी विविध शुल्क भरण्याची पद्धत आणि डिजिटल स्वरूपातील अभ्यासक्रमासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही विद्यार्थ्यांनी केली.
परीक्षा झाल्यानंतर अनेक महिने निकाल न लागल्याने पुढील प्रवेश, उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांचे अर्ज भरताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा मुद्दाही प्रकर्षाने मांडण्यात आला. उत्तरपत्रिका तपासणीतील विलंब तसेच तांत्रिक अडचणींमुळे काही निकाल रखडत असल्याचे निदर्शनास आले.
“तक्रारीसाठी विद्यार्थ्यांना मुंबईला धाव घ्यावी लागू नये”
परीक्षा देऊनही निकालात ‘Absent’ दाखविणे अथवा ‘Held’ची नोंद होणे यामागे डेटा एंट्री व तांत्रिक त्रुटी कारणीभूत ठरत असल्याचे सिनेट सदस्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना प्रत्येक तक्रारीसाठी मुंबईला जावे लागू नये, यासाठी स्थानिक पातळीवरील तक्रार निवारण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन देण्यात आले.
नवीन परीक्षा पद्धतीशी जुळवून घेताना सुरुवातीच्या काळात काही अडचणी असल्या तरी अंतर्गत मूल्यमापन अधिक सुलभ व विद्यार्थी-केंद्रित करण्याबाबत व्यवस्थापन परिषदेत चर्चा सुरू असल्याचे सिनेट सदस्यांनी सांगितले. निकाल वेळेत लागावेत यासाठी ऑनलाइन मूल्यांकन प्रक्रिया अधिक प्रभावी करण्याबरोबरच विद्यापीठ प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे बदललेले नियम व परीक्षा पद्धती वेळेत समजावेत यासाठी महाविद्यालयीन व्हॉट्सॲप ग्रुप, डिजिटल नोटीस बोर्ड आणि इतर डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करण्यावर भर देण्याचे सांगण्यात आले.
सिनेट म्हणजे केवळ सभागृह नव्हे, विद्यार्थ्यांचा आवाज
मुंबई विद्यापीठ हे देशातील ऐतिहासिक आणि महत्त्वाचे विद्यापीठ असून, विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी सिनेट सदस्यांनी थेट महाविद्यालयांमध्ये जाणे ही स्वागतार्ह बाब असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विद्यार्थी आणि विद्यापीठ यांच्यातील दुवा म्हणजे सिनेट सदस्य, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून त्या विद्यापीठाच्या सर्वोच्च वैधानिक व्यासपीठावर मांडणे आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पाठपुरावा करणे, ही सिनेटची मूलभूत जबाबदारी आहे.
“विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम अलीकडील विविध विद्यार्थी आंदोलनांतून दिसून आला आहे. ‘झेन-जी’समोरील प्रश्न वेगळे असले तरी त्यावर मात करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे शिक्षण आणि कौशल्य. चळवळीतून पुढे आलेल्या सिनेट सदस्यांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची जाणीव आहे,” असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.
पेपरफुटीविरोधातील आंदोलनांसह देशभरातील युवा पिढीने आपली ताकद दाखवून दिली आहे. आजच्या बदलत्या रोजगारविश्वात कौशल्य, आवड आणि त्यातून करिअर घडविणे महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळे विद्यापीठानेही विद्यार्थ्यांच्या बदलत्या गरजा आणि आव्हाने समजून घेऊन शिक्षणव्यवस्था अधिक विद्यार्थी-केंद्रित करणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी मांडलेले सर्व प्रश्न विद्यापीठ स्तरावर मांडून त्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित परीक्षा, निकाल, प्रमाणपत्रे आणि इतर अडचणी दूर करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे सिनेट सदस्यांनी आश्वासन दिले.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
यावेळी युवा सेना राज्य विस्तारक निलेश गवळी, उपजिल्हा संघटक सुजीत कीर, लांजा तालुकाप्रमुख युवराज हांदे, रत्नागिरी तालुकाप्रमुख कमलाकर कदम, राजापूर तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील, चिपळूण तालुकाप्रमुख बळीराम गुजर, रत्नागिरी शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, ज्येष्ठ शिवसैनिक सतीश चव्हाण, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे, कॉलेज युनिट जिल्हा अधिकारी पारस साखरे, महिला उपजिल्हा संघटक रशिदा गोदड, लांजा युवासेना तालुकाप्रमुख अभि राजेशिर्के, रत्नागिरी युवासेना तालुका अधिकारी संदेश नारगुडे, चिपळूण युवासेना तालुका अधिकारी प्रीतम वंजारे, रत्नागिरी शहर युवासेना अधिकारी आशिष चव्हाण, चिपळूण युवासेना शहराधिकारी पार्थ जागुष्टे, युवासेना अधिकारी किसन पाटील, निखिल बने, उपविभागप्रमुख गोदड, बाबा धावणे, सुजित भुर्के, समरीन सावकार, युवती सेना चिपळूण तालुका अधिकारी तीर्था लाड, चिपळूण तालुका समन्वयक अनुष्का संसारे, उपतालुका अधिकारी श्रीया खेडेकर, युवा सेना उपशहर अधिकारी आकाश कदम, विभाग अधिकारी मानसी चाळके, विभागप्रमुख प्रशांत सुर्वे, आदित्य कामत, आबा मोरे, शाकीर आरकटे, सिद्धेश मोरे, रेहान पवार, आर्यन मोरे, आदर्श कदम, झईद शहा आदी पदाधिकारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सिनेट सदस्यांनी महाविद्यालयाच्या दारात पोहोचणे, त्यांच्या अडचणी थेट ऐकून घेणे आणि त्या प्रश्नांना विद्यापीठाच्या पातळीवर न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची भूमिका स्पष्ट करणे, हा या विद्यार्थी संवाद यात्रेचा मुख्य संदेश ठरला.
