चिपळूण (विशेष प्रतिनिधी)- चिपळूण शहरातील मुख्य सस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे पादचारी, वाहनचालक हैराण झाले होते. मार्कंडी, उक्ताड, पेठमाप, पोलीस वसाहत, बुरुमतळी या भागांतील खड्ड्यांमुळे रोज ये-जा करणारे वाहनचालक चांगलेच त्रस्त झाले होते. मात्र आता चिपळूण पालिकेचे बांधकाम सभापती कपिल शिर्के यांनी स्वतः पुढाकार घेऊन पालिकेच्या बांधकाम विभागाकडून खड्डे बुजवायला सुरूवात केली आहे. चिपळूणच्या मार्कंडी भागातील खड्डे सिमेंट काँक्रीटने सर्वप्रथम भरण्यात आले. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून मार्कंडी भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एक लेन सुरू ठेवून हे खड्डे भरले जात आहेत.

त्याचप्रमाणे बुरुमतळी येथील पोलीस वसाहतीच्या समोरील रस्त्यांवरील खड्डेही भरण्यात येत आहेत. नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती कपिल शिर्के यांनी शहरातील सर्वच रस्ते खड्डेमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार पेठमाप इंडियन जिम समोरील खड्डेही बुजविण्यात आले. उपनगराध्यक्ष रुपाली दांडेकर, नगरसेवक विकी लवेकर, प्रमुख बुरटे यांनी जातीने हजर राहून खड्डे भरून घेतले. आता उक्ताडमधील खड्डे भरले जातील अशी माहिती कपिल शिर्के यांनी दिली. खड्डे भरण्याच्या कामाच्या वेळी सभापती शिर्के स्वतः हजर असतात. त्यांच्या या कर्तव्यभावनेचे जनतेकडून समाधान व्यक्त होत आहे.