रत्नागिरी : प्रभात रोड परिसरातील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्लोबल फाउंडेशन परिवारातील सदस्यांना अत्यंत दुःखद बातमी असून, सामाजिक कार्यकर्ते श्री. अजित जोशी व श्री. श्रीकांत जोशी यांचे वडील कै. जयंत श्रीधर जोशी यांचे आज, बुधवार, ९ सप्टेंबर २०२६ रोजी दुःखद निधन झाले. ते Small Savings विभागात Assistant Director म्हणून कार्यरत होते.
कै. जयंत जोशी स्वभावाने अत्यंत शांत, सर्वांचा आदर करणारे आणि शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. सरकारी सेवेत असताना त्यांनी प्रत्येक काम अत्यंत काळजीपूर्वक आणि जबाबदारीने पार पाडले.
कै. जोशी यांचे मूळ गाव गुहागरजवळील नरवण असून, तेथे त्यांची शेती होती. ते निसर्गप्रेमी आणि शेतीप्रिय होते. शहरापेक्षा गावात राहून शेती करणे, झाडे लावणे आणि त्यांचे संगोपन करणे हे त्यांनी वयाच्या ८६व्या वर्षापर्यंत अखंड सुरू ठेवले.
त्यांच्या निसर्गप्रेमाचा आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श पुढील पिढीनेही जपला आहे. त्यांचा आदर्श घेऊन त्यांचे चिरंजीव श्री. अजित जोशी यांनी सेवानिवृत्तीनंतर तब्बल ४,००० हून अधिक झाडे लावून त्यांचे संगोपन केले असून, या माध्यमातून एक आदर्श निर्माण केला आहे.
जोशी परिवारातील सर्व सदस्य उच्चशिक्षित असून, वडिलांप्रमाणेच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. प्रभात रोड फाउंडेशनची पहिली बैठक कै. जयंत जोशी यांच्या घरी झाली आणि तेथूनच फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचा वटवृक्ष बहरला.
नारायण तलाव स्वच्छता अभियानासह विविध सामाजिक उपक्रमांमध्ये जोशी परिवाराचा सातत्याने सक्रिय सहभाग राहिला आहे. कचरा काढणे, बाटल्या गोळा करणे, झाडे लावणे आणि त्यांचे संगोपन करणे अशा विविध उपक्रमांमध्ये सौ. धनश्री जोशी, श्री. अजित जोशी, श्री. श्रीकांत जोशी आणि सौ. मृणाल जोशी यांनी स्वतःची महत्त्वाची कामे बाजूला ठेवून मोलाचा सहभाग दिला आहे.
कुटुंबीयांच्या पश्चात…
कै. जयंत श्रीधर जोशी यांच्या पश्चात पत्नी सौ. सिंधू जोशी (तहसील कार्यालय, प्रशासकीय अधिकारी), ज्येष्ठ चिरंजीव श्री. श्रीकांत जोशी, सून सौ. मृणाल जोशी, नातू श्री. गौरव जोशी (सध्या जर्मनीत), नात कु. अमृता श्रीकांत जोशी (CA, पुणे), चिरंजीव श्री. अजित जयंत जोशी, सून सौ. धनश्री अजित जोशी, नातू श्री. आशुतोष अजित जोशी (MBA) आणि श्री. अक्षय अजित जोशी (Designer) असा परिवार आहे.
अंत्ययात्रा आज सायंकाळी-
कै. जयंत श्रीधर जोशी यांची अंत्ययात्रा आज, ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता प्रभात रोडवरील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.
प्रभात रोड फाउंडेशन परिवाराच्या वतीने कै. जयंत श्रीधर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
