मुंबई : बेरोजगारीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाच्यावतीने २७ ऑगस्ट रोजी ‘बेरोजगार हक्क एल्गार’ राज्यव्यापी तिरंगा मोटारसायकल मोर्चाची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्हा व विभागा मध्ये हा मोर्चा निघणार आहे.
या मोर्चाच्या माध्यमातून एमआयडीसीमध्ये स्थानिकांना रोजगार, रिक्त सरकारी पदांची तातडीने भरती, पेपरफुटी रोखणे आणि पोलीस भरती वेळेत करणे यासह अनेक प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत. प्रत्येक जिल्हा व विभागा मध्ये प्रमुख ठिकाणापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा मोटरसायकलवरून काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे विभागीय नेतृत्व निश्चित करण्यात आले आहे.
मुंबईमध्ये राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भासाठी अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे, मराठवाड्यासाठी राजेश टोपे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर येथे, तर उत्तर महाराष्ट्रासाठी आमदार रोहित पवार आणि सुनील भुसारा यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे मोर्चा निघणार आहे. पश्चिम महाराष्ट्राचे नेतृत्व आमदार जयंत पाटील आणि हर्षवर्धन पाटील करणार असून, कोकण विभागासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठाणे येथे मोर्चा होईल.
प्रमुख मागण्या काय आहेत?
- सर्व शासकीय विभागांतील रिक्त पदांची नियमित व वेळेवर भरती करावी.
- प्रत्येक एमआयडीसीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांसाठी रोजगार विनिमय केंद्र पुन्हा सुरू करावे.
- स्थानिकांना पात्रतेनुसार रोजगार देण्यासाठी कृती आराखडा तयार करावा.
- पेपरफुटी व परीक्षा गैरप्रकारांना आळा घालून दोषींवर कठोर कारवाई करावी.
- आरक्षणातील अनुशेष (बॅकलॉग) तातडीने भरावा.
- कंत्राटी पद्धतीऐवजी पात्र युवकांना नियमित शासकीय सेवेत प्राधान्य द्यावे.
- पोलीस दलातील रिक्त पदांची तातडीने भरती करावी.
- भरती प्रक्रियेत विलंबामुळे उमेदवारांची वयोमर्यादा संपणार नाही, याची दक्षता घ्यावी.
- जिल्हानिहाय रोजगार निर्मितीचा ठोस कार्यक्रम जाहीर करावा.