चिपळूण : दि चिपळूण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने दिव्यांग व्यक्तींसाठी तालुकास्तरीय मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, रत्नागिरी यांच्या सहकार्याने हे शिबिर २५ ऑगस्ट २०२६ रोजी उपजिल्हा रुग्णालय, कामथे येथे सकाळी ९.३० ते दुपारी १.३० या वेळेत होणार आहे.
या शिबिरात अस्थिव्यंग, अल्पदृष्टी/अंधत्व, बौद्धिक अक्षमता तसेच मानसिक आजार या दिव्यांगत्वाच्या प्रकारांची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीनंतर पात्र दिव्यांग व्यक्तींना शासनामार्फत दिव्यांगत्व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
शिबिरासाठी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक असून १५ ते २४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत नोंदणी करता येणार आहे. सचिन कॉम्प्युटर व सायबर कॅफे, श्रीराम औषधी भांडारच्या बाजूला, कोर्ट रोड, बुरुमतळी, चिपळूण येथे ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नोंदणी शुल्क चिपळूण अर्बन बँकेतर्फे भरण्यात येणार आहे.
नोंदणीसाठी फोटो, आधारकार्ड, आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक आणि सही अथवा अंगठा आवश्यक आहे. तपासणीच्या दिवशी ऑनलाइन प्रणालीवरील नोंदणी फॉर्म, रत्नागिरी जिल्ह्यातील आधारकार्ड तसेच जुने वैद्यकीय रिपोर्ट सोबत आणणे आवश्यक आहे.
दिव्यांग व्यक्तींनी या मोफत तपासणी शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन चिपळूण अर्बन बँकेचे अध्यक्ष मोहन मिश्गल व उपाध्यक्ष धनंजय खातू यांनी संचालक मंडळाच्या वतीने केले आहे.
