रायगड : रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाचे मंत्री Bharat Gogawale भरत गोगावले यांनी नागोठणे विभागाचा दौरा करून पूरग्रस्त भागांची पाहणी केली तसेच स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली.
पाहणीदरम्यान मंत्री गोगावले यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या तसेच बाधित नागरिकांना तातडीने आणि सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. विशेषतः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पुराच्या पाण्यामुळे अडकलेल्या प्रवाशांना त्वरित मदत करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
महामार्गावर अडकलेल्या प्रवाशांसाठी अन्न, पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक सुविधांची तात्काळ व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले. तसेच मदत व बचाव कार्यात कोणतीही दिरंगाई होऊ नये आणि पूरग्रस्त भागांवर सातत्याने लक्ष ठेवावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी, स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाचे सदस्य उपस्थित होते. जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन पूर्णपणे सतर्क असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.
