मुंबई : पुणे जिल्ह्यातील जेजुरी नगरीत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सोमवारी पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी श्री. चव्हाण यांनी पालखी सोहळ्यातील भाविकांशी आणि वारकऱ्यांशी संवाद साधला.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आपण वर्षानुवर्षे माऊलीच्या दर्शनाला येत असतो. आज जेजुरी येथे दर्शन घेतले आणि दर्शनातून प्रत्येकाला मिळत असलेला वेगळा आनंद अनुभवला. वारकरी संप्रदायाची आणि आमची यावर असीम श्रद्धा असल्याने पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही कुठे ना कुठे दर्शन घेत असतो. माऊलींच्या अथांग ऊर्जेने भरलेल्या चरणी नतमस्तक होऊन राज्यातील मायबाप जनतेच्या सुखासाठी, समृद्धीसाठी आणि कल्याणासाठी आपण यावेळी प्रार्थना केली, अशा शब्दात श्री. चव्हाण यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी भाविकांच्या अडीअडचणी जाणून घेत त्या दूर करण्याच्या दृष्टीनेही त्यांनी संबंधितांना सूचना केल्या. यावेळी वारकऱ्यांनी आणि भाविकांनी श्री. चव्हाण यांच्याशी संपर्क साधत सरकारने दिंडीसाठी केलेल्या उपाययोजना आणि सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले.