मंडणगड : सणासुदीचे दिवस आणि नागरिकांची तसेच वाहनांची वाढलेली वर्दळ लक्षात घेता मंडणगड-बाणकोट-वेळास मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, या मार्गावरील अनेक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंडणगड विभागामार्फत रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात आले असले, तरी या कामाच्या दर्जाबाबत स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, डांबरी रस्त्यावर पडलेले खड्डे योग्य दर्जाच्या डांबरी साहित्याने दुरुस्त करण्याऐवजी काही ठिकाणी सिमेंट काँक्रीटचा वापर करून भरले जात असल्याचा आरोप आहे. खड्डे भरण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य तसेच कामाची पद्धत समाधानकारक नसल्याने अशा प्रकारे करण्यात येणारी दुरुस्ती किती काळ टिकणार, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
यापूर्वी दुरुस्ती करण्यात आलेल्या काही खड्ड्यांमध्ये पावसामुळे पुन्हा खड्डे पडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वारंवार खड्डे भरूनही ते पुन्हा निर्माण होत असतील, तर दुरुस्तीच्या कामाचा दर्जा तपासण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. संबंधित ठेकेदाराने कामाकडे योग्य लक्ष न दिल्यामुळे रस्त्याची समस्या कायम असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, बाणकोट परिसरासह साखरी व अन्य मार्गांलगत वाढलेली झाडे-झुडपे आणि योग्य प्रकारे न छाटलेल्या फांद्यांमुळेही वाहनचालकांना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात रस्त्यालगत वाढलेल्या झाडाझुडपांमुळे काही ठिकाणी समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेणे कठीण होत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केलेल्या खड्डे दुरुस्तीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून वापरण्यात येणाऱ्या साहित्याचा दर्जा तपासावा. तसेच काम नियमानुसार व टिकाऊ पद्धतीने करण्यात यावे. निकृष्ट दर्जाचे काम आढळल्यास संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
या मागणीसाठी हेमंत सालदूरकर, सुशील यादव, सुयोग गुहागरकर आणि तेजस सालदूरकर यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. सणासुदीच्या काळात या मार्गावर वाढणारी वाहतूक लक्षात घेता रस्त्याची तातडीने योग्य पद्धतीने दुरुस्ती करून वाहनचालकांचा त्रास दूर करावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
सणासुदीच्या काळात बाणकोट-वेळाय रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्यरस्त्याच्या दुरुस्तीच्या दर्जावर ग्रामस्थांचा सवाल; निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी…
