खेड : – तालुक्यातील शिरवली येथील माहेरवाशिणी व सवनस येथील सासुरवाशिणी व सध्या महिला व बाल विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगावर सौ. मिलन देवेंद्र जंगम (गुरव) यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे
. सामाजिक, शैक्षणिक तसेच महिला सक्षमीकरण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सौ. मिलन जंगम (गुरव) या अनुभवी मार्गदर्शक, समुपदेशक, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. मानसशास्त्रीय समुपदेशन व प्रशिक्षण क्षेत्रात त्यांनी विशेष कार्य केले असून शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी अनेक वर्षे योगदान दिले आहे. महिला सक्षमीकरण, आरोग्य जनजागृती, शिक्षणाची गुणवत्ता वाढ आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. पुणे, रत्नागिरी तसेच विविध ग्रामीण भागांमध्ये महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे, स्तन कर्करोग जनजागृती मोहिमा, ऑनलाइन व्यवसाय प्रशिक्षण, बचत गट कार्यशाळा आणि आदिवासी व वंचित महिलांसाठी मदतकार्य त्यांनी राबविले आहे. तसेच कोरोना काळात शैक्षणिक साहित्य वाटप आणि पूरग्रस्तांसाठी मदतकार्यही त्यांनी केले.
त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रीय स्वयंसिद्ध पुरस्कार (२०२५), समाजरत्न पुरस्कार (२०२३), पुणे महानगरपालिका महिला सक्षमीकरण सन्मान (२०२०) यांसह विविध सामाजिक संस्थांकडून सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांच्या या नियुक्तीमुळे राज्यातील बालहक्क संरक्षण, बालकल्याण, बालसुरक्षा आणि बालशिक्षण क्षेत्राला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.